व्हीपीकेच्या ठेवीदारांना लाखापर्यंतच्या ठेवी काढण्यास मुभा!

२५ लाखांपर्यंतच्या कर्जासही मंजुरी; आर्थिक निर्बंधांत सहा महिन्यांनी वाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: व्हीपीके अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवरील आर्थिक निर्बंध आणखी सहा महिन्यांनी वाढवले आहेत. पण ठेवी काढण्यासाठी असलेली मर्यादा ६० हजारांवरून एक लाख, तर कर्ज देण्याची मर्यादा १५ लाखांवरून २५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे. सहकार निबंधक अरविंद खुटकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

हेही वाचाः जॉन अगियार यांना स्वातंत्र दिनी ‘राष्ट्रपती पदक’

कृतिदल समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय

संचालक मंडळाच्या बैठकांसाठी उपस्थित राहणाऱ्या संचालकांना टीए, डीए देण्यासही निबंधकांनी परवानगी दिली आहे. व्हीपीके अर्बनसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या कृतिदल समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्बंध सहा महिन्यांनी वाढवण्याचा, पण नियमांत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला. नियम शिथिल करीत असताना सोसायटीचे ‘नेट वर्थ’ वाढवण्यासाठी तसेच नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासकीय खर्चावर मर्यादा घालण्याचे निर्देशही कृतिदल समितीने दिले आहेत.

५ जून २०२० रोजी सुरुवातीला सरकारने 6 महिन्यांसाठी लागू केले होते आर्थिक निर्बंध

सोसायटीने नियमांचे उल्लंघन करीत कर्ज वाटप केल्याचा तसेच अनेकांकडून कर्जाची वेळेत परतफेड होत नसल्याने सोसायटी नुकसानीत गेल्याचे स्पष्ट होताच सरकारने ५ जून २०२० रोजी व्हीपीने अर्बन बँकेवर सुरुवातीला सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू केले होते. या काळात ठेवीदारांना प्रतिमहिना प्रत्येकी २० हजारांच्या ठेवी काढता येतील तसेच बँकेला ५ लाख रुपयांपर्यंतचीच कर्जे वितरित करता येतील, असे नियम लागू करण्यात आले. सहा महिन्यांचे निर्बंध संपल्यानंतर बँकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृतिदल समितीने ८ फेब्रुवारी २०२१ रोजी बैठक झाली. त्यात सोसायटीवरील निर्बंध आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आले. पण, ठेवीदारांना महिन्याला २० हजारांवरून ६० हजार रुपये काढण्यास मुभा देण्यात आली. तसेच सोसायटीला सुरक्षा घेऊन १५ लाखांपर्यंतची कर्जे देण्यासही मान्यता देण्यात आली.

हेही वाचाः नौदलाला ध्वजारोहणासाठी विरोध करणं राष्ट्रविरोधी! मुख्यमंत्र्यांची सेंट जासिंतोंवरील स्थानिकांवर टीका

ठेवी काढण्याची मर्यादा ६० हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आली

दरम्यान, फेब्रुवारीत घालण्यात आलेले सहा महिन्यांचे आर्थिक निर्बंध संपल्यानंतर कृतिदल समितीची नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीत ठेवी काढण्याची मर्यादा ६० हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आली, तर कर्जदारांकडून सुरक्षा घेऊन २५ लाखांपर्यंतची कर्जे देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचाः पर्ल अकॅडमी लाँच करत आहे ‘पर्लएक्सस्टुडिओ’

ठेवीदारांत आनंद, समाधान

आ​र्थिक निर्बंधांतील नियमांत शिथिलता देण्यात आल्याने व्हीपीके अर्बन बँकेच्या ठेवीदारांत आनंद पसरला आहे. सोसायटीच्या राज्यभरात एकूण ३८ शाखा असून, ग्रामीण भागांतील जनतेला सोसायटीचा मोठा आधार आहे. सोसायटीवर आर्थिक निर्बंध लागू झाल्यानंतर ठेवीदारांत नाराजी पसरली होती. पण त्यानंतर टप्प्याटप्प्याने नियमांत शिथिलता देण्यात आल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला होता.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | TRIBAL WELFARE| आदिवासी कल्याण भवनाची पायाभरणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!