‘या’ जमीनदाराने कुळांच्या नावावर केल्या जमिनी, घरे

शेखर नाईक | प्रतिनिधी
उसगाव : सत्तरी महालात अजूनही मोकासो आणि मोकासदार ही पद्धत आहे. पोर्तुगीजांनी सुरू केलेल्या या परंपरेत गावातील राणे, देसाई आदी मोकासदार आढळून येतात. त्यावेळी पोर्तुगीजांनी नेमलेल्या मोकासदारांच्या जमिनींवर गाव वसले. गावातील मोकासदारांची तोंडी परवानगी घेऊन तेथे घर बांधणे अशी पद्धत अजूनही सुरू आहे. मात्र, घरे बांधली तरी ती लोकांच्या नावावर होत नाहीत. त्यांना मालकी हक्क मिळत नाही. या परंपरेला सालेली-सत्तरी येथील मोकासदार विश्वजीत कृष्णाराव राणे यांनी छेद देत, दातृत्त्वाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
विश्वजीत यांनी आपल्या सालेली गावातील लोकांना त्यांच्या नावावर घरे आणि जमीन फुकट देऊ केली आहे. गुरुवारी वाळपई मामलेदार कार्यालयात काही जणांचे सेलडीड (मालकीहक्क दस्तावेज) वाटप झाले. या संदर्भात विश्वजीत कृ. राणे म्हणाले, मी माझ्या सालेली गावातील लोकांना त्यांच्या नावावर मोफत घरे आणि जमीन करून देण्याचे योजले. त्यानुसार आज काही जणांना सेलडीडचे वाटपही केले. जसजसे कायदेशीर सोपस्कार पूर्ण होतील, त्याप्रमाणे लोकांना सेलडीड देण्यात येईल. मधील काळात कोविड-19मुळे या कामात व्यत्यय आला. मात्र, आता लगोलग सगळ्यांच्या नावावर घर आणि जमीन करून देण्यासाठी आपण स्वत: लक्ष घातले आहे.
विश्वजीत कृ. राणे पुढे नेतात कुटुंबाचा वारसा
विश्वजीत कृष्णाराव राणे यांच्या घराण्याला समाजसेवेची परंपरा आहे. त्यांचे वडील कृष्णाराव हे स्वातंत्र्यसैनिक. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शिक्षाही भोगली आहे. त्यावेळी त्यांच्या घरात स्वातंत्र्यसैनिकांच्या गुप्त बैठका होत. आता विश्वजीत कृ. राणे हे आपल्या वडिलांचा समर्थ वसा पुढे नेत आहेत, असे गावातील लोकांनी सांगितले. सत्तरी तालुक्यात अनेक मोकासदार आहेत. त्यात काही असे आहेत की, ते लोकांना त्रास देतात. मात्र, यात विश्वजीत कृष्णाराव राणे हे अपवाद ठरले आहेत, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया गावकर्यांनी दिली आहे.