‘डिजिटल इंडिया’ साठी ६१ हजार १०९ कोटींचा निधी

पंतप्रधानांच्या घोषणेसाठी अर्थमंत्र्यांनी केली भरीव निधीची तरतूद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प म्हणजे डिजिटल इंडिया. या प्रकल्पांतर्गत भारतातील प्रत्येक गाव इंटरनेट ब्रॉडबँडने जोडण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला देशाला केलेल्या संबोधनपर भाषणात केली होती. येत्या १ हजार दिवसांमध्ये अर्थात साधारणपणे ३ वर्षांमध्ये देशाच्या प्रत्येक गावामध्ये इंटरनेट पोहोचवण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने ठेवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करोनाच्या काळात देशाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठीच्या योजना घोषित केल्यानंतर देशातील प्रत्येक गाव इंटरनेटने जोडण्याच्या योजनेसाठी देखील भरीव निधीची तरतूद केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात घोषणा केली आहे. गावागावात इंटरनेट पोहोचवण्यासाठी २०१७ मध्ये केंद्र सरकारने ४२ हजार ०६८ कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. मात्र, आता त्यामध्ये अतिरिक्त १९ हजार ०४१ कोटींची तरतूद करण्यात आली असून या प्रकल्पासाठीचा एकूण निधी ६१ हजार १०९ कोटींच्या घरात गेला आहे.

या योजनेअंतर्गत भारतनेटचे पीपीपी मॉडेल एकूण १६ राज्यांमध्ये पोहोचले आहे. देशातल्या एकूण २ लाख ५० हजार ग्रामपंचायतींपैकी १ लाख ५६ हजार २२३ ग्रामपंचायतींनी भारतनेटच्या ब्रॉडबँड सेवा-सुविधा गावांमध्ये ३१ मार्च २०२१पर्यंत तयार केल्या आहेत. आता नव्या निधीच्या माध्यमातून भारतनेट अपग्रेड करून सर्व ग्रामपंचायती आणि आतल्या भागात असणाऱ्या गावांनाही इंटरनेटच्या माध्यमातून जोडणं शक्य होणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!