विजय सरदेसाईंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लसीकरण केंद्र म्हणून ‘गोंयकार घर’ उपयोगात आणण्याचा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला प्रस्ताव

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड-19 लसीकरण केंद्र म्हणून ‘गोंयकार घर’चे दरवाजे सरकारसाठी खुले असल्याचा प्रस्ताव गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना दिलाय. फातोर्डा आमदार कार्यालय असलेले गोंयकार घर लसींकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी आरामदायी आणि उत्कृष्ट जागा असल्याचं सरदेसाई म्हणालेत.

हेही वाचाः ResignModi हॅशटॅग चुकून झाला ब्लॉक, सरकारकडून नव्हती कोणती सूचना

स्वतःला गोंयकार म्हणून पहा

गोव्यात लसीकरण मोहिमेदरम्यान भाजपचे लोगो आणि बॅनर असंवेदनशीलपणे वापरले जातायत. हे सगळं लोकांसाठी त्रासदायक असल्याची तीव्र चिंता आणि अस्वस्थता सरदेसाई यांनी व्यक्त केली. लसीकरण हा देशव्यापी एकसंध प्रयत्न आहे आणि कोरोना विषाणूच्या विरुद्ध चाललेल्या या लढाईत आपण स्वत:ला कुठल्या विशिष्ट पक्षाशी संबंधीत न समजता, केवळ एक गोंयकार म्हणून पाहिलं पाहिजे, असं मत सरदेसाईंनी व्यक्त केलं.

हेही वाचाः खाटांसह डॉक्टरांचीही कमतरता

एकीची ताकद जगाला दाखवण्याची गरज

राज्यात कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून, ते चाचणी वाढवण्याची मागणी, राज्यात येणाऱ्या प्रवाशांकडून निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवालांचा आग्रह धरणं, सामाजिक अंतर पाळण्याचे कठोर नियम लागू करणं, ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलणं आणि गोंयकारांचं लसीकरण होता होईल तेवढं लवकर करणं इ.साठी गोवा फॉर्वर्डने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांकडे सरदेसाईंनी लोकांचं लक्ष वेधलं. आता सर्व गोंयकारांनी एकमेकांना मदत करण्याची वेळ आली आहे. कारण या महामारीतून आपण एकत्र मिळूनच बाहेर पडू शकतो. एकीची ताकद काय असते हे आपण गोंयकारांनी आज जगाला दाखवून देण्याची गरज आहे.

हेही वाचाः जीएसआयडीसीला कारणे दाखवा नोटीस; तर मुख्यमंत्री वादाच्या भोवऱ्यात

गोंय आणि गोंयकाराला पहिलं प्राधान्य

‘गोंयकार घर’चा प्रस्ताव मी तुमच्या समोर विरोधी पक्षाचा नेता म्हणून ठेवत नाही, तर एक सच्चा काळजीवाहू गोंयकार म्हणून ठेवतोय. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर आपण लोकांना नेहमीच मदत करण्याची आणि पाठिंबा देण्याची शपथ घेतली आहे. आणि म्हणून गोंय आणि गोंयकाराला पहिलं प्राधान्य देण्याची आज वेळ आहे, असं सरदेसाईंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं.

हा व्हिडिओ पहाः रुग्णांना स्ट्रेचरवर, खूर्चीवर बसवून सुरु आहेत उपचार

राज्यात कमांड सेंटरची आवश्यकता

गोव्याला आज निर्णायक नेतृत्वाची गरज आहे आणि राज्यात कोविड-19 कमांड सेंटर स्थापन करण्याची आज गरज आहे. हे कमांड सेंटर राज्यव्यापी सार्वजनिक आणि खासगी वैद्यकीय ऑपरेटर्सना मदत करेल आणि लोकांना खाटा उपलब्धता, लसीची ठिकाणं आणि ऑक्सिजन पुरवठा याविषयी योग्य वेळेत माहिती देईल.

हेही वाचाः लॉकडाऊन कालावधीत राज्यात केटीसी सेवा 50% क्षमतेसह सुरू

गोंयकारांचं लसीकरण लवकर करा

लसीकरण ही काळाची गरज आहे आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे आणि सरकारच्या चुकीच्या प्राधान्यक्रमांमुळे गोंयकारांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय हे पाहून वेदना होतात. सर्व गोंयकारांचं शक्य असेल तेवढं लवकर लसीकरण करावं. लॉकडाऊनदरम्यान गोवा फॉरवर्ड पार्टी संकटात सापडलेल्या गोंयकारांना जमेल तसा पाठिंबा देईल, असं आश्वासन सरदेसाईंनी दिलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!