वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन संशयितांना अटक

सुपारी घेऊन खून; दोन्ही संशयित मूळ उत्तरप्रदेशचे; पुढील तपास सुरू

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्कोः गुरुवारी ईसोर्शी – बोगमाळो येथे गोळी झाडून अमर नाईक यांचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आलीये. मोठ्या प्रमाणात केलेल्या पोलीस शोध मोहिमेत दोन्ही संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. सुपारी घेऊन हा खून केला असल्याचं समोर आलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित हे मूळ उत्तरप्रदेशमधील असल्याची माहितीही मिळतेय. दरम्यान पुढील पोलीस तपास सुरू असल्याची माहिती वास्को पोलिसांकडून देण्यात आलीये.

ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

वास्को पोलिसांनी १२ तासांच्या आत या प्रकरणात सहभागी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करत गोवा पोलिसांचं अभिनंदन केलं. ट्विट करताना मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय, बोगमाळो गोळीबार आणि खून प्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक करत दाखवलेली तपासातील तत्परता कौतुकास्पद आहे. मी गोवा पोलिसांचं अभिनंदन करतो. घृणास्पद प्रकरणे हाताळण्यासाठी गोवा पोलिसांच्या दृष्टिकोनाचं कौतुक.

काय आहे प्रकरण?

मुरगाव तालुक्यातील इसोर्शी पंचायत क्षेत्रात बोगमळा येथे गुरुवारी गोळ्या घालून अमर नाईक या युवकाचा खून करण्यात आला. जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या अमर नाईक याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोर सापडले होते. त्यावरून तपास करत शुक्रवारी पहाटे संशयितांना वास्को पोलिसांनी अटक केलीये.

दक्षिण गोव्यातील मुरगांव तालुक्यात इसोर्शी पंचायत क्षेत्रातील बोगमळा येथे अडगळीत असलेल्या ठिकाणी ही घटना घडली. हे प्रकरण प्रॉपर्टी व्यवहारातून झालं असावं, अशी शक्यता वर्तविण्यात येतेय. घटनास्थळी अडगळीत सापडलेल्या स्विफ्ट कारचा हा घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस घेत आहेत. ही रेंट ए कार उत्तर गोव्यातील प्रतिश गोवेकर याच्या मालकीची आहे. ही कार नेमकी कुणी भाड्यावर घेतली होती, याचा शोध पोलिस घेत आहेत.

दरम्यान, अमर नाईक हा आपल्या मित्रासोबत हल्लेखोरांना भेटण्यासाठी आपल्या खाजगी वाहनाने सागर एन्क्लेव इथे आला होता. तिथेच कदाचित त्याचा आणि हल्लेखोरांचा वाद होऊन त्यातून हा गोळीबाराचा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिस वर्तवित आहेत.

हेही वाचाः ‘या’ ६ धक्कादायक घटनांनी सिद्ध केलं, कायद्याचा धाक उरलेला नाहीच!

कोण आहे अमर नाईक?

ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याचं नाव अमर नाईक असून तो नवेवाडे वास्को येथील रहिवाशी आहे. चिखली येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दोन आठवड्यांपूर्वीच आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यानंही कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले होते. दरम्यान, आता झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोविडची परिस्थिती पूर्ववत होत असतानाच गुन्हेगारी प्रकरणांतही वाढ होण्याची शक्यता असून त्या दृष्टीकोनातून पोलिसांना आपली कार्यपद्धती बदलावी लागणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | ALERT | मुसळधार पावसामुळे डोंगरातील पाणी मातीसह रस्त्यावर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!