घरगुती वाद सार्वजनिक करणाऱ्या धक्कादायक Videoनं गुंता वाढवला

व्हिडीओ काढत महिलेचा पतीवर गंभीर आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्याच्या शेजारील राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात सरकारमधील नेते धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा प्रकरण ताजं असतानाच आता राज्यातही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानं पोलिसही चक्रावून गेलेत. हा प्रकार नेमका आहे तरी काय आणि नेमकं काय घडलं ते सविस्तर आधी जाणून घेऊयात.

व्हिडीओ आला व्हायरल झाला

व्हॉट्सऍप, फेसबुकच्या जमान्यात व्हिडीओ वायरल होणं, ही काही नवी बाब राहिलेली नाही. पण पत्नीनं आपल्या मुलीसोबत एक व्हिडीओ काढणं, त्याच्यावर सनसनाटी आरोप करणं आणि पत्र लिहून घरगुती बाब सार्वजनिक करणं, अशा गोष्टी वारंवार घडताना दिसत आहेत. ताजं उदाहरण म्हणायचं तर रेणू शर्मा आणि जुनं उदाहरण म्हणायचं तर मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीसोबतचा झालेला सगळा सोशल मीडियातील ड्रामा.

घटना कुठची?

आता जे प्रकरण समोर आलंय ती घटना कळंगुटची असल्याचं कळतंय. गोव्यासारख्या छोट्या राज्यात या कानाची गोष्ट त्या कानाला पोहोचेपर्यंत वेळ लागत नाहीच. झालंही तसंच. एका महिलेनं मोबाईल व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये पीडित महिलेनं आपल्या पतीवर गंभीर आरोप केले. मारहाण करणं, छळणं, पैशांसाठी धमकावणं यासोबतच सांगताही येणार नाही, असे भयंकर आणि धक्कादायक आरोप पीडित महिलेनं व्हिडीओ काढून केलेत. या महिलेनं काढलेल्या या सेल्फी व्हिडीओमध्ये एक पुरुष दिसून येतोय. तसंच पीडित महिलेची मुलगीही दिसते. या दोघीही ओक्साबोक्शी रडत रडत आपलं म्हणणं मांडताना दिसतात. उद्विग्नपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या या दोघींचा व्हिडीओ कुण्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करेल.

वाद मिटला?

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हाट्सअपवर बघता बघता वाऱ्यासारखा पसरला. तो पोलिसांपर्यंतही पोहोचला. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. चौकशी केल्यानंतर हा सगळा घरगुती वाद असल्याचं पोलिसांच्या समोर आलं. घरगुती वाद आणखी पेटेल, त्याआधीच पीडित महिलेच्या कुटुंबीयांना एकत्र येत हा सगळा वाद मिटवला असल्याचं सांगितलं जातंय. ही संपूर्ण घटना आणि त्याचा व्हिडीओ वायरल झाल्याचं कळल्यानंतर कुटुंबीय एकत्र आले आणि त्यांनी आपला घरगुती वाद घरातल्या घरातच मिटवला. मात्र आता ही गोष्ट इथेच संपत नाही.

अजूनही विषय मिटलेला नाही…

पती आपल्याला जीवे मारेल, अशी धमकी दिल्याचं पीडित महिलेनं आपल्या पत्रात नमूद केलंय. या पत्रातील अनेक गोष्टी काळजी करायला लावणाऱ्या अशा आहेत. त्यामुळे निश्तिच हा घरगुती वाद घरातल्या घरात जरी मिटलेला असला तरी घरगुती वाद सार्वजनिक झाल्यानंतर उद्या या महिलेसोबत काही झालंच, तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. सोबतच आणखी एक प्रश्नही अनुत्तरीतच राहतो, तो तिच्या पतीबद्दलचा. खरोखरच पीडितेनं पतीवर केलेल्या आरोपात तत्थ आहे की नाही, याचंही उत्तर हा वाद घरातल्या घरातच मिटल्यामुळे शिल्लक राहतो.

आता पुढं काय?

घरगुती वाद घरातच मिटल्याचा दावा करण्यात आलाय. पोलिसांत सध्यातरी कोणती तक्रार असल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र या प्रकारानं अनेक सवाल उपस्थित केलेत.

महिलांनी अशा पद्धतीनं व्हिडीओ काढून आरोप करणं, घरगुती वाद सार्वजनिक करणं आणि त्यानंतर प्रकरण घरातल्या घरातच मिटवलं जाणं, यामुळे अनेक शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. अडचणीत आल्यानंतर व्हिडीओ बनवून ते वायरल करणं, सोशल मीडियावर पसरवं हे जास्त सोप्प आणि पोलिसांकडे जावून मदत मागणं कठीण, असा काहीचा समज यानिमित्तानं होऊ लागला आहे का, याचाही विचार होणं गरजेचंय.

तसंच पोलिसांनीही या संपूर्ण घटनेवरुन एका गोष्टीचा बोध घेण्याची गरज आहे. सार्वजनिक जीवनात लोकांच्या संवेदनांना आव्हान देत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चुकीच्या माणसांकडून होत असेल, तर ते कितपत योग्य आहे, असा सवालही जाणकारांनी उपस्थित केलाय.

हेही वाचा – Video | ऐतिहासिक विजयानंतरचे अंगावर काटा आणणारे क्षण कॅमेऱ्यात कैद

हेही वाचा – गोवन वार्ता लाईव्हच्या ब्रेकिंग वापरुन Viral होतंय Meme

Panchnama | तुमचा फोन हॅक होण्याआधी हा व्हिडीओ बघा!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!