गोवा हॉर्टिकल्चर दुकानांवर आता भाजीपाला उपलब्ध होणार नाही?

बेळगावातून गोव्यात येणारा भाजीपाला मंगळवारपासून बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविड संचारबंदीच्या काळात बेळगावाहून येणारा आणि गोवा फलोत्पादन विकास महामंडळाच्या दुकानांवर हक्काने उपलब्ध होणारा भाजीपाला आता उपलब्ध होणार नाही. बेळगावातून गोव्यात भाजीपाला येणं बंद होणार आहे. बेळगावातील भाजी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तेथील व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे गोव्याला होणारा भाजीपाला पुरवठा खंडित होणार आहे.

हेही वाचाः पीपीई सूटमध्ये घाम गाळणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांना दिलासा

तोपर्यंत भाजी मार्केट बेमुदत काळासाठी बंद

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेली सीपीएड मैदान आणि ऑटोनगर येथील आरटीओ मैदानावरील भाजी मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे एपीएमसी आवारात भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी द्यावी. जोपर्यंत एपीएमसीत पुन्हा भाजी मार्केट सुरू केले जात नाही, तोपर्यंत भाजी मार्केट बेमुदत काळासाठी बंद करण्यात आलं आहे. मंगळवारपासूनच याच्या अंमलबजावणीला सुरवात झाली.

हेही वाचाः कोविड-19 संदर्भातल्या मंत्री गटाची 26 वी बैठक संपन्न

वादाचे कारण?

एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन तेथील प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी भाजी मार्केट उभारलं आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नसल्यानं व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसात गाळ्यांमध्येच पावसाचं पाणी तुंबलं होतं. भाजीपालाही पावसात भिजल्यानं भाजी खराब झाली. याचा फटका शेतकऱ्यांसहीत व्यापाऱ्यांना बसला. वादळी वाऱ्यामुळे एका शेडवरील पत्रा वाऱ्याने उडून गेला. या घटनेत व्यापारी थोडक्यात वाचला. अन्यथा, मोठी दुर्घटना झाली असती. सीपीएड मैदानातूनही उच्चभारीत वीजेची केबल गेली आहे. ती केबलही व्यवसायिकांसाठी धोकादायक आहे.

हेही वाचाः ‘म्युकरमायकोसिस’चा गोव्यात शिरकाव; जीएमसीत सापडले सहा रुग्ण

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एपीएमसीने केलेल्या दोन्ही भाजी मार्केटध्ये सुविधांचा अभाव आहे. रात्री भाजीही चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. एपीएमसीत प्रशस्त जागा असल्याने त्या ठिकाणी आपल्याला आरामात व्यवसाय करता येणार आहे. यामुळे तत्काळ येथील बाजार बंद करून एपीएमसीतच भाजी मार्केट सुरू करावं, अशी मागणीही तेथील भाजी विक्रेत्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी यासंबंधी एपीएमसी सचिवाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन दिलं.

हेही वाचाः म्युकरमायकोसिसः ब्लॅक फंगसचे संक्रमण का होत आहे?

सुविधांचा अभाव

एपीएमसीने शहरात दोन ठिकाणी भाजी मार्केट सुरू केलं आहे. मात्र, या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. पावसामुळे व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या दोन्ही भाजी मार्केटचं एपीएमसीत स्थलांतर करेपर्यंत भाजी मार्केट बंद ठेवण्यात येईल. यासबंधी जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सचिवाबरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा भाजीपाला व्यापारी संघाचे सचिव सतीश पाटील यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!