वास्कोत घरावर दरड; महिला चिरडली

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

वास्को : येथील गोवा शिपयार्डनजीकच्या डोंगराची सोमवारी रात्री दरड कोसळली. एक भला मोठा दगड घरंगळत खाली आला आणि घरात घुसला. या दगडाखाली सापडून अनिता नाईक बोरकर (63) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अजित बचावला. या दगडामुळे घराची मोडतोड झाली. शेजारील महादेव नाईक, संदेश नाईक यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले. वास्को अग्निशमन दल व आपत्कालीन कामावरील मुरगाव पालिका कामगारांनी सुमारे साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दगडाखालून बाहेर काढण्यात आला. वास्को पोलिसांनी पंचनामा केला.
अनिता नाईक बोरकर आपल्या मुलासह रहात होत्या. त्यांच्या शेजारी त्यांचा पुतण्या महादेव नाईक कुटुंबासह राहतात. आसपास इतरही घरे आहेत. दरडी कोसळण्याच्या घटनेला त्यांना वरचेवर सामोरे जावे लागते. येथे मुसळधार पाऊस सुरू होता. डोंगराची दरड सोमवारी रात्री बाराच्या सुमारास कोसळली. दरडीसह भला मोठा दगड खाली आला. तो घरंगळत अनिता नाईक यांच्या घराची भिंत फोडून आत शिरला. खोलीमध्ये झोपलेल्या अनिता त्या दगडाखाली सापडल्या. दगड पुढे जाऊन महादेव नाईक यांच्या खोलीची भिंत फोडून तेथे स्थिरावला. या दुर्घटनेत अनिता जागीच मरण पावल्या. इतरांना काही प्रमाणात जखमा झाल्या.

वास्को अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी दगड हटविण्याच्या कामाला आरंभ केला. पोलिसांनी मदतकार्य केले. या दुर्घटनेत अनिता नाईक यांच्या घराच्या खोल्या जमीनदोस्त झाल्या. प्रापंचिक साहित्यांची मोडतोड झाली. महादेव आणि संदेश नाईक यांच्या घरातील किचन व इतर खोल्यांची, सामानाची मोडतोड झाली. त्यांना लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. महादेव नाईक यांनी दरड कोसळण्याचा आवाज ऐकला होता. तथापि एखादे माड कोसळले असावे, असे त्यांना वाटले. घरात शिरलेल्या दगडामुळे जोरदार हादरे बसल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून कुटुंबासह बाहेर धाव घेतली. यात त्यांना व त्यांच्या मुलाला काही जखमा झाल्या.

जलस्रोतचे विशेष पथक आज पाहणी करणार
आमदार कार्लुस आल्मेदा मामलेदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, अभियंते यांची बैठक घेऊन परिस्थितीवर चर्चा केली. कोसळण्याच्या स्थितीत असलेले दोन खडक हटविण्याचे काम त्वरित हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. बुधवारी जलस्त्रोत विभागाच्या विशेष पथकाला पाहणी करण्यासाठी पाचारण केले आहे. संरक्षक भिंतीसाठी त्या पथकाचे मत विचारात घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही येथे दरडी कोसळल्या आहेत. त्यावेळी मालमत्तेचे नुकसान झाले होते. संरक्षक भिंत बांधण्याची रहिवाशांची मागणी आहे. त्याचे सोपस्कार आमदार आल्मेदा यांनी सुरू केले होते. त्या जागेच्या मालकाचा ‘ना हरकत’ मिळाला नव्हता. तो मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाईक कुटुंबियांची राहण्याची सोय करावी. घरबांधणीसाठी पंतप्रधान निधीतून सहाय्य करावे.
नंदादीप राऊत, नगराध्यक्ष, मुरगाव

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!