वास्को अमर नाईक खून प्रकरण: अमर नाईक यांच्यावर आज अंत्यसंस्कार

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी
वास्कोः गुरुवारी ईसोर्शी – बोगमाळो येथे गोळी झाडून खून झालेल्या अमर नाईक यांच्यावर आज दुपारी 12 वाजता खरीवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. गुरुवारी दिवसाढवळ्या अमर नाईक यांच्यावर गोळ्या झाडून दोघांनी त्यांचा खून केल्याची घटना घडली होती. दोघे संशयित आरोपी शैलेश गुप्ता (२९, गोरखपूर – उत्तर प्रदेश) आणि शिवम सिंग (२२, जौनपूर – उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली असून त्यांना 7 दिवसांची कोठणी सुनावण्यात आली आहे. अमर नाईकचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाल्याचे शव विच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. खून कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलिस करत आहेत.
नेमकं काय झालं?
मुरगाव तालुक्यातील इसोर्शी पंचायत क्षेत्रात बोगमळा येथे गुरुवारी गोळ्या घालून अमर नाईक या युवकाचा खून करण्यात आला. जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या अमर नाईक याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोर सापडले होते. त्यावरून तपास करत शुक्रवारी पहाटे संशयितांना वास्को पोलिसांनी अटक केलीये.
हेही वाचाः अनुराधा परवार यांना यथाशक्ती मदत करा
दक्षिण गोव्यातील मुरगांव तालुक्यात इसोर्शी पंचायत क्षेत्रातील बोगमळा येथे अडगळीत असलेल्या ठिकाणी ही घटना घडली. हे प्रकरण प्रॉपर्टी व्यवहारातून झालं असावं, अशी शक्यता वर्तविण्यात येतेय. घटनास्थळी अडगळीत सापडलेल्या स्विफ्ट कारचा हा घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस घेत आहेत. ही रेंट ए कार उत्तर गोव्यातील प्रतिश गोवेकर याच्या मालकीची आहे. ही कार नेमकी कुणी भाड्यावर घेतली होती, याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, अमर नाईक हा आपल्या मित्रासोबत हल्लेखोरांना भेटण्यासाठी आपल्या खाजगी वाहनाने सागर एन्क्लेव इथे आला होता. तिथेच कदाचित त्याचा आणि हल्लेखोरांचा वाद होऊन त्यातून हा गोळीबाराचा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिस वर्तवित आहेत.
हा व्हिडिओ पहाः VIDEO | वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन संशयितांना अटक
संशयित आरोपी मित्राच्या आमंत्रणावरून आले होते गोव्यात
संशयित आरोपी शिवम सिंग आणि शैलेश गुप्ता यांनी अमर नाईकवर गुरुवारी गोळ्या झाडल्या होत्या. त्यातच अमर नाईकचा मृत्यू झाला. दोघेही संशयित आरोपी नवी मुंबई येथे राहतात. शैलेश हा क्रेन ऑपरेटर आहे. एका मित्राच्या आमंत्रणावरून ते गोव्यात आले होते. घटनास्थळावर दोनदा भेट देऊन त्यांनी पाहणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आणखीनही काहीजणांना अटक केली आहे. हे प्रकरण नेमकं कशासाठी घडलं आणि एकूणच घटनाक्रम काय होता हे नंतर सांगू, अशी माहिती पोलिस अधिक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिलीए.
हेही वाचाः ‘जस्ट डायल’चा ताबा रिलायन्स व्हेंचर’कडं ; तब्बल ३४९७ कोटींना खरेदी केला मालकी हिस्सा
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दोन आठवड्यांपूर्वीच आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यानंही कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले होते. दरम्यान, आता झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोविडची परिस्थिती पूर्ववत होत असतानाच गुन्हेगारी प्रकरणांतही वाढ होण्याची शक्यता असून त्या दृष्टीकोनातून पोलिसांना आपली कार्यपद्धती बदलावी लागणार आहे.