वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन्ही संशयित आरोपींना 7 दिवसांची कोठडी

अमर नाईकचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाल्याचं शव विच्छेदन अहवालात स्पष्ट

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्कोः गुरुवारी ईसोर्शी – बोगमाळो येथे गोळी झाडून अमर नाईक यांचा खून करणाऱ्या दोन्ही संशयित आरोपी शैलेश गुप्ता (२९, गोरखपूर – उत्तर प्रदेश) आणि शिवम सिंग (२२, जौनपूर – उत्तर प्रदेश) यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमर नाईकचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाल्याचे शव विच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

संशयित आरोपी मित्राच्या आमंत्रणावरून आले होते गोव्यात

संशयित आरोपी शिवम सिंग आणि शैलेश गुप्ता यांनी अमर नाईकवर गुरुवारी गोळ्या झाडल्या होत्या. त्यातच अमर नाईकचा मृत्यू झाला. दोघेही संशयित आरोपी नवी मुंबई येथे राहतात. शैलेश हा क्रेन ऑपरेटर आहे. एका मित्राच्या आमंत्रणावरून ते गोव्यात आले होते. घटनास्थळावर दोनदा भेट देऊन त्यांनी पाहणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आणखीनही काहीजणांना अटक केली आहे. हे प्रकरण नेमकं कशासाठी घडलं आणि एकूणच घटनाक्रम काय होता हे नंतर सांगू, अशी माहिती पोलिस अधिक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिलीए.

हेही वाचाः विरोधकांना घाबरुनच सरकारचे ३ दिवसांचे विधानसभा अधिवेशन

नेमकं काय झालं?

मुरगाव तालुक्यातील इसोर्शी पंचायत क्षेत्रात बोगमळा येथे गुरुवारी गोळ्या घालून अमर नाईक या युवकाचा खून करण्यात आला. जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या अमर नाईक याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोर सापडले होते. त्यावरून तपास करत शुक्रवारी पहाटे संशयितांना वास्को पोलिसांनी अटक केलीये.

दक्षिण गोव्यातील मुरगांव तालुक्यात इसोर्शी पंचायत क्षेत्रातील बोगमळा येथे अडगळीत असलेल्या ठिकाणी ही घटना घडली. हे प्रकरण प्रॉपर्टी व्यवहारातून झालं असावं, अशी शक्यता वर्तविण्यात येतेय. घटनास्थळी अडगळीत सापडलेल्या स्विफ्ट कारचा हा घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस घेत आहेत. ही रेंट ए कार उत्तर गोव्यातील प्रतिश गोवेकर याच्या मालकीची आहे. ही कार नेमकी कुणी भाड्यावर घेतली होती, याचा शोध पोलिस घेत आहेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन संशयितांना अटक

दरम्यान, अमर नाईक हा आपल्या मित्रासोबत हल्लेखोरांना भेटण्यासाठी आपल्या खाजगी वाहनाने सागर एन्क्लेव इथे आला होता. तिथेच कदाचित त्याचा आणि हल्लेखोरांचा वाद होऊन त्यातून हा गोळीबाराचा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिस वर्तवित आहेत.

हेही वाचाः अनुराधा परवार यांना यथाशक्ती मदत करा

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दोन आठवड्यांपूर्वीच आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यानंही कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले होते. दरम्यान, आता झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोविडची परिस्थिती पूर्ववत होत असतानाच गुन्हेगारी प्रकरणांतही वाढ होण्याची शक्यता असून त्या दृष्टीकोनातून पोलिसांना आपली कार्यपद्धती बदलावी लागणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | MURDER | महाराष्ट्रातील दोघा संशयितांना अटक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!