कृषी हाच गोव्याचा शाश्वत व्यवसाय

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
केेपेः कृषी हाच गोव्याचा शाश्वत व्यवसाय असून अनुसूचित जमाती समुदाय हा या व्यवसायाला पारंपरिक पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे, असे उद्गार राज्याचे कृषी मंत्री तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी काढले. केपे तालुक्यातील बार्शे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या गोकुल्डे स्थित दयानंद बांदोडकर हायस्कूलमध्ये आयोजित वनमोहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत माजी सहकार मंत्री तथा गोवा कृषी पणन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष खुशी वेळीप, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचाः हवामान खात्याकडून राज्यात यलो, ऑरेंज अलर्ट जारी
जैका अंतर्गत जल वाहिनी टाकण्याचं काम पूर्ण
आपल्या अध्यक्षीय भाषणात उपमुख्यमंत्र्यांनी बार्शे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या काळात होणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यात प्रामुख्याने साळावलीचे पाणी गावात आणण्यासाठी जैका अंतर्गत जल वाहिनी टाकण्याचं काम पूर्ण झालं असून लागणाऱ्या टाक्यांचं बांधकामही झालं आहे. ज्यामुळे गावच्या पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसात सुटणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या संपूर्ण भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा प्रकल्प कार्यान्वित असून लागलीच त्याचं काम ग्रासरूट लेव्हलवर बघणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
प्रकाश वेळीप यांनीच या संस्थेला आणि शाळेला जोपासलं
दयानंद बांदोडकर शाळेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, प्रकाश वेळीप यांनीच या संस्थेला आणि शाळेला जोपासलं आणि गोकुल्डे सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गेली २७ वर्षं शिक्षण प्रदान करण्याचं बहुमूल्य कार्य ते करत असल्याचं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सहकार क्षेत्रातसुद्धा प्रकाश वेळीप यांचं योगदान त्यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेल्या आदर्श कृषी संस्थेमुळे सर्व गोव्याला माहीत असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचाः गोवा किनारी विभाग व्यवस्थापन जनसुनावणीच्या वेळी लोकशाहीचा खून
झाडं नुसती लावूया नको, ती जगवूया
आपल्या भाषणात माजी मंत्री प्रकाश वेळीप म्हणाले, गेली दोन वर्षं चाललेल्या कोविड महामारीत प्राणवायूचं महत्व लक्षात आलं. या वनमोहोत्सवाच्या निमित्ताने आपण झाडं नुसती लावूयाच नको तर ती जगवण्याची प्रतिज्ञा करूया. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की, महामारीत शाळा बंद असल्यानं अभ्यास थांबवू नका. आज ना उद्या हे सर्व थांबेल आणि जे शिक्षणापासून लांब राहिले त्यांना फार मोठी अडचण होणार.