‘या’ पालिकेची शववाहिकाच मृत्यूशय्येवर

महेश दिवेकर | प्रतिनिधी
वाळपई : येथील नगरपालिकेची शववाहिका नादुरुस्त बनल्यामुळे नागरिकांना यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे ही शववाहिका त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ही शववाहिका नादुरुस्त आहे. शववाहिकेची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती रुतून बसलेली आहे. यामुळे वाळपई व बहुतांश ग्रामीण भागामध्ये नागरिकांची गैरसोय झाली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढता पाऊस अशा परिस्थितीत ग्रामीण भागांतील कुणी शहरात निवर्तल्यास नातेवाईकांचे हाल होतात आणि पार्थिव शरीराचीही परवड होते.
शहरात फक्त वाळपई नगरपालिकेकडे ही व्यवस्था उपलब्ध होती. वाळपई सरकारी रुग्णालय किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे व मृतदेह वाहतुकीसाठी खाजगी वाहने तयार नसल्याने समस्या निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना आपली गरज भागविण्यासाठी साखळी किंवा डिचोली भागातील शववाहिका आणावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत खर्चीक आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे वाळपई नगरपालिकेने शववाहिकेची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajeet Rane) यांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन याबाबत निर्माण होणारी समस्या दूर करण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे.