पर्यटकांना लस व आरटीपीसीआर प्रमाणपत्र यापुढेही सक्तीचे असावे

मंत्री मायकल लोबो मुख्यमंत्र्यांकडं करणार मागणी

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : ठप्प असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू केल्यानंतर गोव्यात प्रवेश करताना कोरोना लसचे दोन्ही डोस किंवा आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र यापुढेही सक्तीचे असायला हवे, असे मत मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले. पर्रा येथे शेतकर्‍यांना फळझाडे व खत वितरणानंतर मंत्री लोबो पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सरपंच डिलायला लोबो व पंचायत सदस्य उपस्थित होते. सध्या महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे पर्यटकांची रेलचेल गोव्याकडे सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोबो यांनी वरील मतप्रदर्शन केले.

बस, विमान किंवा रेल्वे मार्गे गोव्यात प्रवास करणार्‍यांना कोरोना लसचे दोन्ही डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य असायलाच हवे. याविषयी आपण मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव देवून तो मंत्रिमंडळात मांडण्याची विनंती करणार आहोत, असे लोबो म्हणाले. भविष्यात पर्यटन व्यवसाय खुला करावा लागेल. यासाठी ही सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे. अजुन कोरोनाचा संसर्ग आहे. लोकांचे मृत्यू होत आहेत. या स्थितीत सरकारने सर्वांशी विचार विनिमय करूनच हा निर्णय घेणे आवश्यक आहे.

रेल्वे स्थानकावर तपासणी केली जात नसल्यास आपण चौकशी करणार आहोत. असा प्रकार आढळल्यास मुख्यमंत्र्यांसह संबंधितांकडे यावर कार्यवाही करण्याची मागणी केली जाईल, असेही मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सरपंच डिलायला लोबो म्हणाल्या, साळगाव कचरा प्रकल्पात तयार होणार्‍या खताची प्रत्येकी एक पिशवी आणि फळझाडे गावातील शेतकर्‍यांना विनाशुल्क वितरित करण्यात आली आहे, अशाचप्रकारे शेतकर्‍यांना लागणार्‍या गरजांची पंचायतीतर्फे पुर्तता केली जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!