बलात्काऱ्यांविरोधात पोलीस बळाचा वापर करा, गोवेकरांविरोधात नको !

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोव्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र, तरीही नागरिकांच्या आंदोलनांबाबत दडपशाही केली जात आहे. सरकारच्या या कृत्याचा आम आदमी पक्षाने तीव्र निषेध केला. गोव्यातील नागरिक आणि तरुणांनी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मिरामार सर्कल येथे मूक मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, प्रमोद सावंत यांच्या सांगण्यावरून हा निषेध प्रतिबंधित ठेवत आणि दडपला गेला. महिलांचे रक्षण करताना ही स्पष्टता का दाखवली नाही, असा प्रश्न नागरिकांनी विचारला.
भाजपचे साथीदार असणाऱ्या काँग्रेसला रॅली काढण्यासाठी सावंत यांनी परवानगी दिली. परंतु गोव्यातीलच नागरिक आणि तरुणांना ही परवानगी नाकारली गेली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबाबत विधानसभेत काँग्रेसने त्यांना धारेवर धरले नाही. हा दुटप्पीपणा आश्चर्यजनक नक्कीच नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की, या आठवड्यात राज्यात तीन बलात्कार पीडित महिला समोर आल्या. महिलांना त्यांच्या सुरक्षेबाबतचे ठोस आश्वासन तर दिले गेले नाहीच. पण बलात्कार्यांचा निषेध करण्याऐवजी बलात्काराचा दोष पीडितेला देण्यात आला. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दोषी ठरविणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अनेक जण नाराज आहेत.
या घटनेचा निषेध करणाऱ्यांकडे लक्ष देणे सरकारला महत्वाचे वाटत नाही. मात्र, बलात्कार पीडितांना सरकार पाठिंबा देऊ शकते आणि त्यांना न्याय मिळेल याची खात्री करू शकते. जर वेळीच कठोर पाऊले उचलली गेली नाहीत, तर अशा गुन्ह्यांतील गुन्हेगारांना आणखी प्रोत्साहन मिळेल.
‘आता हे नाटक पुरे झाले’ असे आम आदमीचे गोव्याचे निमंत्रक राहुल म्हांबरे म्हणाले. लोकांकडून होणाऱ्या निषेधाला दडपण्याऐवजी प्रमोद सावंत यांनी पुढे येऊन, या घटनेबाबत कोणती पावले उचलली, याची माहिती द्यावी. आणि जर हे करणे त्यांना जमत नसेल, तर सरळ त्यांनी त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे, अशी ठोस मागणी म्हांबरे यांनी केली आहे.