अधिकाधिक ऊर्जास्रोतांची नितांत गरज!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : आगामी काळात राज्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने राज्य सरकारने अधिकाधिक ऊर्जास्रोत तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत सूक्ष्म, लघु, मध्यम व्यावसायिक (एमएसएमई) संघटनेचे गोवा अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी सोमवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
पर्यटन हंगामात राज्यात नेहमीच विजेचा मोठा तुटवडा भासत असतो. गेल्या वर्षी तीच परिस्थिती झाल्याने त्याचा फटका राज्यातील उद्योग विश्वाला बसू लागला आहे. त्यामुळे उद्योजकांनीच अधिक दराने वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर करीत बाहेरून वीज विकत घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार वीज खाते बाहेरून अधिक दराने वीज विकत घेऊन उद्योगांना विजेचा पुरवठा करीत आहे. पुढील काळात राज्यात घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही गटांकडून विजेला मोठी मागणी येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने आताच योग्य ती पावले उचलून अधिकाधिक ऊर्जास्रोत तयार करणे आवश्यक आहे, असे कोचकर म्हणाले.
दरम्यान, गेल्या साडेपाच महिन्यांत राज्यातील सहा उत्पादन कंपन्यांनी वीज खात्याला पत्र पाठवून विजेसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. काम सुरू असताना वीज पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका कंपन्यांना सहन करावा लागत असल्याची खंत या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी वीज खात्याला सादर केलेल्या पत्रांतून केल्याचे वीजमंत्री ढवळीकर यांच्या आणखी एका उत्तरातून समोर आले होते. त्यासंदर्भात बोलताना, ही समस्या राज्यात अनेक वर्षांपासून आहे. औद्याेगिक वसाहतींना वीज पुरवण्यासाठी आवश्यक साधनसुविधा नसल्यामुळेच तेथे खंडित वीजपुरवठ्याच्या घटना घडत असून, त्याचा फटका अनेक कंपन्यांना बसत असल्याचेही कोचकर यांनी सांगितले.