उर्फान मुल्लांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी

स्थानिक नेत्यांवर केली होती टीका

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : काँग्रेसच्या गोवा राज्य अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रवक्तेपदाचा राजीनामा देउन स्थानिक नेत्यांवर टीका करणार्‍या उर्फान मुल्ला यांना पक्षाने सहा वर्षांसाठी बडतर्फ केलंय.

मुल्ला यांनी पदांचा राजीनामा दिला होता, मात्र काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा त्यांनी दिला नव्हता. पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांवर कडाडून टीका केली होती. तसेच आपण या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली असल्याचं ते म्हणाले होते. त्याचबरोबर आपल्या पत्राची दखल न घेतल्यास समर्थकांसह पक्षाला रामराम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र गोवा काँग्रेस कार्यकारिणीनं या प्रकाराची कठोर दखल घेत मुल्ला यांना पक्षातून बडतर्फ केलंय.

काय म्हणाले काँग्रेसचे सरचिटणीस…

उर्फान मुल्ला यांना पक्षातून बडतर्फ करत असल्याचं पत्र गोवा काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई यांनी जारी केलं. मुल्ला यांनी दिलेले पदाचे राजीनामे पक्षाने स्वीकारले आहेत. मात्र त्यांनी माध्यमांकडे ज्या भाषेत प्रतिक्रिया व्यक्त केली, ते पाहता त्यांची ही कृती पक्षविरोधी कारवायांमध्ये मोडते आणि हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही. शिवाय मुल्ला यांनी ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करताना पक्षशिस्तीचं उल्लंघन केलं. यातून पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागला. या सर्व प्रकारातून मुल्ला हे पक्षाच्या विरोधात कार्यरत आहेत की काय, अशी शंका येते. या आधारावर मुल्ला यांना पक्षातून सहा वर्षांसाठी बडतर्फ करत असल्याचं फळेदेसाई यांनी नमूद केलंय.

काय म्हणाले होते उर्फान मुल्ला..?

उर्फान मुल्ला यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून गोव्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांविरोधात तक्रार केली. शिवाय अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आणि प्रवक्तेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गोव्यातील काँग्रेसमधील युवा नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर ज्या नेत्यांचा यापूर्वी विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला, अशा वयस्कर नेत्यांना पक्ष पुन्हा पुन्हा संधी देतो. मात्र आपल्यासारख्या युवा नेत्याला पुरेसा वाव मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. सरकारविरोधातील सर्व चळवळी आम्ही युवा नेते चालवतो. कायदेशीर कारवाई, पोलिस केसेसना तोंड देतो. लोकांचं मतपरिवर्तन करतो. मात्र याचा फायदा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना होतो. त्यांनाच पक्ष मोठा करतो. माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते खितपत पडून राहतात. हा अन्याय आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी पक्षाच्या पदांचा राजीनामा देत आहे, असे मुल्ला म्हणाले होते.

मुल्लांची पुढची वाटचाल कशी असेल..?

उर्फान मुल्ला हे मडगावातील नेते. युवक वर्गात त्यांची चांगली प्रतिमा आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली कामगिरी बजावली. राज्यातील अल्पसंख्याक समाजाशी संपर्क असल्याने त्यांना राजकीय वाटचालीत याचा निश्चितच फायदा होउ शकतो. मात्र ते कोणत्या पक्षात जातात आणि तेथे कोणती जबाबदारी त्यांना मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तूर्तास आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड हे दोन पर्याय मुल्ला यांच्यासमोर आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!