हर हर महादेव! गोवा पर्यटन खात्यानं सोशल मीडिया पोस्टसाठी नेमला विशेष ‘सुभेदार’

गाफील आणि बेजबाबदारपणाला कदापी थारा नाही

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : मराठ्यांचा उल्लेख आक्रमणकर्ते करण्याचा नादानपणा गोवा पर्यटन खात्याला चांगलाच भोवला. सडकून टीका झाली. विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला. आणि अखेर गोवा पर्यटन खात्याला धडा शिकवण्याची मोहिम फत्ते झाली. चुकीला माफी नाही, असं म्हणतात. हाच नियम गोवा पर्यटन खात्यानंही पाळला. क्षत्रिय मराठा समाजातून आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री बाबू आजगांवकर यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं. संबंधितांवर कठोरातवी कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

चुकीला माफी नाही!

एस के नार्वेकरांनी याप्रकरणी पूर्ण चौकशी केली. गोवा पर्यटन खात्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर असणाऱ्या नार्वेकरांनी या पोस्टवरुन संबंधितांची चौकशी केली. तशी प्रेस नोटही जारी करण्यात आली आहे. यातून धडा घेत आता गोवा पर्यटन विभागाचं आयटी सेल गाफिल आणि बेजबाबदारपणा झटकून कामाला लागेल, अशी तजवीज करण्यात आली आहे. सोबतच मराठे आणि त्याच अनुशंगानं छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याचीही तातडीनं जबाबदारीतून हकालपट्टी करण्यात आलीय.

पुढं काय?

या घटनेनंतर गोवा पर्यटन खातं खडबडून जागं झालंय. गोवा पर्यटन खात्याच्या आयटी दलातील सर्व ‘सैनिक’ यापुढे दक्ष आणि सतर्क राहून पोस्टा पोस्टी करतील अशी तजवीज करण्यात आली आहे. त्यासाठी एक ‘सुभेदार’ही नेमण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा सुभेदार यापुढे गोवा पर्यटन खात्याच्या आयटी दलाकडून होणाऱ्या सर्व पोस्ट अपलोड होण्याआधी तपासेल. त्यात गरज असल्यास सुधारही सुचवेल. अर्थात चूक टाळण्यासाठी किंवा चूक होऊच नये यासाठी जबाबदारीची मोहिम या सुभेदारावर असणार आहे.

पुरस्कारानं चुका झाकल्या जात नाहीत

२०१७ साली पुरस्कारानं गोवा पर्यटन खात्याला गौरवण्यात आलं होतं. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर केल्याबद्दल गोवा पर्यटन खात्याचं कौतुकही झालेलंय. पुरस्कार मिळाले म्हणजे चुका झाकता येतात असं नाही. चुका होऊ शकतात. पण त्या टाळण्यासाठी आता काळजी घेतली जाणार आहे. शिवरायांचा अपमान केल्यानंतर मराठ्यांच्या डोक्यात गेलेलं गोवा पर्यटन खातं आणि त्यांच्या सोशल मीडियावर प्रत्येकाची बारीक नजर असणार आहे. त्यामुळे गोवा पर्यटन खात्याच्या आयटी सेलचे सुभेदार कशी कामगिरी बजावतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तूर्तासतरी गोवा पर्यटन खात्याला खडबडून जागं करण्याची मोहिम फत्ते झाली याच शंका नाहीच. त्यासाठी सर्वच शिवप्रेमींनी हर हर महादेवचा जयघोष केला, तर त्यात काहीच वावगं नाही!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!