ऐतिहासिक ड्युरँड ट्रॉफीचे अनावरण…

गतविजेता एफसी गोवा स्पर्धेसाठी घरच्या मैदानावर खेळण्यास सज्ज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ऐतिहासिक फुटबॉल स्पर्धा असलेल्या ड्युरँड ट्रॉफी स्पर्धेच्या गोवा येथील टूरला गतविजेता एफसी गोवा क्लबच्या घरच्या मैदानावरून दिमाखात सुरुवात झाली. राज्याचे पर्यटन तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते चषकाचे अनावरण झाले. यावेळी ड्युरँड आयोजन समितीचे अध्यक्ष तसेच इस्टर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ, एसएम, व्हीएसएम लेफ्टनंट जनरल के. के. रेपसवाल आदी उपस्थित होते. ड्युरँड ट्रॉफी टूरचे गोवा हे शेवटचे ठिकाण आहे. पाच शहरांतून गोवा येथे पोहोचलेल्या टूरला १९ जुलैला कोलकाता येथून हिरवा कंदील दाखवण्यात आला.
हेही वाचा:८२ वर्षांचे आजोबा पंचायत निवडणूकीच्या रिंगणात…

गोव्याचे फुटबॉलशी अतूट नाते

त्यानंतर ही टूर गुवाहाटी, इम्फाळ आणि जयपूर मार्गे गोवा येथे दाखल झाली. गोवा येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ड्युरँड चषक ट्रॉफी टूर ही स्पर्धेच्या मुख्य ठिकाणी कोलकाता येथे परतेल. गोव्याचे फुटबॉलशी अतूट नाते आहे. त्यातच ऐतिहासिक ड्युरँड ट्रॉफी टूरचे तीन वेळा यजमानपद गोवन फुटबॉल क्लबने भूषविले असून ही अभिमानास्पद बाब आहे. गोवावासीयांच्या नसानसांमध्ये फुटबॉल असल्यामुळे ड्युरँड ट्रॉफी टूरच्या निमित्ताने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. टूरच्या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी ड्युरँड ट्रॉफी समितीचा आभारी आहे, असे मंत्री रोहन खंवटे यावेळी म्हणाले.
हेही वाचा:उच्च माध्यमिक शाळांनी दत्तक घ्यावी अंगणवाडी…

एफसी गोवा क्लबचा अ गटात समावेश

ड्युरँड आयोजन समितीचे अध्यक्ष रेपसवाल यांनीही विचार मांडले. त्यांनी एफसी गोवाला जेतेपद कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. एफसी गोवाचे अध्यक्ष आणि सह-मालक अक्षय टंडन म्हणाले, गोव्यातील फुटबॉलचे वेड सर्वश्रुत आहे. त्यामुळे टूरचे यजमानपद भूषवता आल्याचा अभिमान वाटतो. ड्युरँड ट्रॉफी पुन्हा होत असल्याने फुटबॉलर आणि चाहते आनंदित झाले आहेत. एफसी गोवाने गेल्या वर्षी ट्रॉफी उंचावली. यंदा ट्रॉफी आमच्याकडे कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू.
१३१व्या ड्युरँड ट्रॉफी स्पर्धेत २० संघ खेळणार आहेत. गतविजेता एफसी गोवा क्लबचा अ गटात समावेश आहे. त्यांच्या गटात मोहमेडन एससी, बेंगळुरू एफसी, आयएसएल विजेता जमशेदपूर एफसी आणि इंडियन एअर फोर्स असे तगडे संघ आहेत.
हेही वाचा:पैकुळमध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करा…

एफसी गोव्याचा सलामी सामना मोहम्मेडन क्लबशी

यंदाच्या ड्युरँड ट्रॉफी स्पर्धेत सलामीला गतविजेता एफसी गोवा संघाची गाठ गेल्या वेळचा उपविजेता मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबशी पडेल. हा सामना १६ ऑगस्टला होईल. ही स्पर्धा १८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ड्युरँड ट्रॉफीमध्ये एफसी गोवा संघ तिसऱ्यांदा सहभागी होत आहे. मागील हंगामात कमालीचे सातत्य राखताना गोवा क्लबने जेतेपद पटकावले होते. 
हेही वाचा:सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला छोटूचा जामीन…

  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!