विद्यापीठ, कॉलेज शिक्षकांना कामावर रुजू होण्याचे निर्देश

उच्च शिक्षण संचालनालयाने जारी केलं परिपत्रक; वर्ग मात्र ऑनलाईन मोडवरच

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात वाढणाऱ्या कोविड महामारीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 9 मे रोजी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर मध्यंतरी दोन वेळा या कर्फ्यूचा काळ वाढवण्यात आला. राज्यात 7 जूनपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आलाय. राज्यव्यापी कर्फ्यूमुळे उच्च शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन वर्ग बंद ठेवत राज्यातील महाविद्यालये तसंच विद्यापीठातील शिक्षकांना घरीच राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता हळुहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय म्हटल्यावर उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी करत विद्यापीठ तसंच कॉलेज शिक्षकांना कामावर रूजू होण्याचे निर्देश दिलेत.

हेही वाचाः संरक्षक भिंत स्थानिक मच्छिमारांच्या होड्यांना संरक्षण देण्यासाठी

उच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश

राज्यातील कोविड आकडेवारी हळुहळू घटतेय. परिस्थिती हळुहळू सुधारतेय. 7 जून हा राज्यातील कर्फ्यूचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे हळुहळू आता राज्यातील सर्व व्यवहार सुरू होतायत. उच्च शिक्षण संचालनालयानेही परिपत्रक जारी करत विद्यापीठ तसंच कॉलेज शिक्षकांना कामावर रूजू होण्यास सांगितलंय. उच्च शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार विद्यापीठ शिक्षकांना 7 जून, तर कॉलेज शिक्षकांना 8 जूनपासून कामावर रूजू व्हावं लागणारेय.

वर्ग मात्र ऑनलाईन मोडवरच चालणार

राज्यातील कोविड परिस्थिती जरी सुधारत असली, तरी कोविड अजून पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे अजूनही काळजी ही घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण संचालनालयाने जरी विद्यापीठ तसंच कॉलेज शिक्षकांना कामावर रूजू होण्यास सांगितलेलं असलं तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवण्याविषयी परिपत्रकात उल्लेख केलेला नाही. विद्यार्थ्यांना अजूनही घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. सर्व वर्ग हे ऑनलाईन मोडवरच सुरू राहणार असल्याचं उच्च शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय. त्याचप्रमाणे कोविड ड्यूटीवर असलेले कर्मचारी तिथेच राहणार असल्याचंही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!