अरे देवा! एम्प्लोयमेंट एक्स्चेंज ते हेच काय?

तीन वर्षांत 33 सरकारी आणि 21 खाजगी नोकऱ्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्य सरकार बेरोजगारांना एम्प्लोयमेंट एक्स्चेंज म्हणजेच रोजगार विनियय केंद्रात नोंदणी करा, असं आवाहन करतं. पण याच रोजगार केंद्रात नोंद झालेल्या कितीजणांना नोकऱ्या मिळतात, याची धक्कादायक माहिती उघड झालीये. राज्यातल्या एम्प्लोयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणी केलेल्यांपैकी गेल्या तीन वर्षांत फक्त 33 जणांना सरकारी नोकरी, तर 21 जणांना खाजगी क्षेत्रात नोकऱ्या मिळालीय. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मजूर आणि रोजगारमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी लेखी उत्तर दिलंय.

राज्यातील नोंदणीकृत बेरोजगारांचा आकडा

राज्य सरकारने 22 जानेवारी 2019 मध्ये एक अधिसुचना जारी करून रोजगार विनिमय केंद्रात ऑनलाईन नोंदणीची सक्ती केलीय. या अनुषंगाने यापूर्वी मॅन्यूअल पद्धतीनं केलेली नोंदणी बाद ठरविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं या लेखी उत्तरात म्हटलंय. 4 फेब्रुवारी 2019 ते 11 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या नोंदणीनुसार 2019 मध्ये 51,354 जणांची नोंद झालीय. 2020 मध्ये 19,040 उमेदवारांनी नोंदणी केलीय तर 11 जानेवारी 2021 पर्यंत 1,134 जणांनी आपली नोंदणी केलीय. या सर्वांची बेरीज केल्यास राज्यातील नोंदणीकृत बेरोजगारांचा आकडा 71,528 असल्याचं दिसून येतं.

कुठे आहेत नोकऱ्या ?

राष्ट्रीय रोजगार विनिमय सेवा मॅन्यूअलनुसार राज्यांतर्गत रोजगार विनिमय केंद्रांना तीन वर्षांच्या नोकऱ्यांसंबंधीचा दस्तऐवज नोंद करून ठेवण्याची सक्ती आहे. यानुसार राज्यातील रोजगार विनिमय केंद्राने 2018, 2019 आणि 2020 ची नोंदणी ठेवलीय. ही नोंदणी धक्कादायक ठरलीय. रोजगार निर्मितीच्या आणाभाका सरकारकडून केल्या जातात. परंतु सरकारी रोजगार विनिमय केंद्राकडून बेरोजगारांची पूर्ण निराशा बनलीय हे उघड होतानाच राज्यातील खाजगी आणि सरकारी नोकर भरतीत रोजगार विनिमय केंद्राला कोणतेही महत्व नसल्याचंच या माहितीतून उघडकीस आलंय. सरकारनेच दिलेल्या माहितीत गेल्या तीन वर्षांत म्हणजेच 71,528 नोंदणीकृत बेरोजगारांपैकी फक्त 33 जणांनाच सरकारी, तर फक्त 21 जणांना खाजगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्यात. याचाच अर्थ सरकारी खाती आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या नोकऱ्यांबाबत रोजगार विनिमय केंद्राला अजिबात विश्वासात घेत नसल्याचं स्पष्ट झालंय. वास्तविक सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात पदांची भरती करताना त्याची माहिती रोजगार विनिमय केंद्राला सादर करणं गरजेचं आहे. याची पूर्तता केली जात नाही आणि रोजगार खाते यासंबंधी कोणतीही कारवाई करीत नसल्याचेच स्पष्ट झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!