‘सिंधुदुर्गचे आपणच कैवारी’ अशा फुशारक्या मारणाऱ्या राजकारण्यांचं पितळ उघडं !

आजी-माजी पालकमंत्र्यांच्या घोषणा हवेतच विरल्या ; सुविधा न मिळाल्यास आवाज उठवणार - एकनाथ गवस

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग (संदीप देसाई ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले, नव्हे राज्यात कोरोनाचा वेगवान स्प्रेडर ठरणारा जिल्हा सिंधुदुर्ग ठरला. याला जिल्हयातील जनतेला आपणच कैवारी असल्याचे भासवणारे राजकारणीच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप दोडामार्ग तालुक्यातील मुंबईस्थित उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते एकनाथ गवस यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू असताना त्यावर राजकारणी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने बिलकुल नियंत्रण न ठेवल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. जिल्हा रुगणालायतील कोविड केंद्र पॉजिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी गेले वर्षभर खुले ठेवल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पसरला, याचे केंद्रबिंदूच जिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटर असल्याचा घणाघात गवस यांनी केलाय.

दोन वर्षे कोविड जिल्ह्यात अनेकांचे बळी घेत असताना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक असलेले सिटी स्कॅन मशीन जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित नसणे यातच बरेच काही आले, असेही गवस यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी याबाबत आपले परखड मत व्यक्त केले असून ते म्हणाले की, महत्त्वाच्या कामासाठी सिंधुर्गात गेलो असता स्थानिक वर्तमानपत्रातील बातम्या आणि मित्रमंडळीशी झालेल्या चर्चेतून परिस्थितीचे भीषण वास्तव समोर आले. एवढ्या मोठ्या जिल्ह्यात एकच मोठे सरकारी रुग्णालय. दर दिवशी सहाशे-सातशे नवे कोरोना रुग्ण सापडत असताना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे केवळ असुविधांच असाव्या, ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. कोविड रुग्णांवर उपचार करताना सिटीस्कॅन आवश्यक असताना आज इतक्या वर्षानंतरही आणि आजच्या आधुनिक काळात जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा नसावी? रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना आरोग्य यंत्रणेने या महत्त्वाच्या सुविधेसाठी काहीच प्रयत्न करू नयेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मे महिन्यात तर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोविडचा सर्वाधिक मृत्यू दर होता. सिटीस्कॅनसारख्या महत्त्वाच्या मशिनरी असत्या तर कदाचित कितीतरी मृत्यू टाळता आले असते. मात्र बडेजाव मारणाऱ्या राजकारण्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.


जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांचा अनिर्बंध वावर आहे. त्याकडे सुद्धा आरोग्य आणि प्रशासन यंत्रणेने केलेले दुर्लक्ष ही सुद्धा अक्षम्य चूक म्हणावी लागेल. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांमुळे जिल्हा रुग्णालय हे सुपर स्प्रेडर ठरले, पॉजिटिव्ह रुग्णांबरोबर सामान्य नागरिक व त्यांचे नातेवाईक यांच्यावर कोणतेही बंधन ठेवण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हयात कोविड अधिक बळावत गेला, असंही त्यांनी सांगितलं. शेवटी उशिरा शहाणपण प्रशासनाला सुचले, आणि निर्बंध घालण्यात आले.

नेहमीच कोकणवर अन्याय होत असतो. कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातलेले असताना राज्य सरकारनेही दुर्लक्ष केले. रुग्ण वाढ रोखणे आणि मृत्यू कमी करणे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसले नाहीत. सर्व तथाकथित राजकारणी, पक्षीय पुढारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, या सर्वांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, ही वस्तुस्थिती आहे. इतकेच नव्हे तर पालकमंत्र्यांनी घोषित केलेलं ५०० ऑक्सीजन बेडचे कोविड सेंटर अद्याप कार्यान्वित झालेलं नाही. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विविध उपाययोजनांच्या माजी पालकमंत्र्यांच्या घोषणा हवेत विरल्या, निदान आतातरी आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात, ही जनतेची मागणी असल्याचे व त्याविरुद्ध आपण आवाज उठवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गवस यांनी शेवटी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!