उगवेतील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पेडणे : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतून गेल्या वर्षी मे महिन्यात तोैक्ते वादळावेळी आलेल्या पाण्याने उगवे तेथील शेतकऱ्यांच्या काजू बागायतीची आणि शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेला वर्ष होत आले तरी अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोपा विमानतळाच्या हद्दीपासून जवळपास दीड किलोमीटर खाली शेतकऱ्यांच्या काजू बागायतीत पाण्याच्या प्रवाहाने मोठी दरी पडली आहे. त्यात हजारो काजू, आंबा, फणस, अशी झाडे उलटून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचाःराज्यात ‘या’ दोन ठिकाणी ‘अग्नितांडव’…
आश्वासन दिले परंतू भरपाई नाही
या घटनेची तक्रार जल स्तोत्र खाते, उपजिल्हाधिकारी, उडान संचालनालय अधिकारी, जी. एम. आर कंत्राटदार यांच्याकडे स्थानिक शेतकऱ्यांनी दिली होती. या तक्रारीची दखल घेत संबंधित खात्यांनी पाहणी देखील केली होती व भरपाई देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. परंतु याची आजपर्यंत कुणीही दखल घेऊन भरपाई दिलेली नाही. गावातील माती जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली परंतु काजू बागायतीत डोंगरावर पडलेल्या दरीकडे अजूनही कुणी नजर वळवली नाही असे शेतकरी हरिश्चंद्र महाले यांनी सांगितले.
हेही वाचाःयापुढे ‘हे’ अवैध काम ‘महागात’ पडेल!
जे काय घडले ते नैसर्गिक होते
जी. एम. आर कंपनीचे अधिकारी आपली काही चुकी नसल्याचे सांगून हात वर करू पाहत आहेत. जे काय घडले ते नैसर्गिक होते असे अधिकारी सांगत आहेत. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही गावात येऊन पाहणी केली होती. त्यानंतर ही माती हटवून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु एकाही आश्वासनाची पूर्तता अजूनही झालेली नाही असे शेतकरी देऊ महाले यांनी सांगितले. आता भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर आले असून त्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवू नये अशी मागणी शेतकरी उदय महाले, एकनाथ महाले व इतरांनी केली आहे.
हेही वाचाःदाबोळी विमानतळावर डीआरआयची ‘मोठी’ कारवाई, तब्बल….