काणकोणातील दोन हजार विद्यार्थी माध्यान्ह आहारापासून वंचित

दर परवडत नसल्याचे स्वयंसाहाय्य गटाचे स्पष्टीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण : शिक्षण खात्याने पुरस्कृत केलेला माध्यान्ह आहार पुरवठ्याचा दर परवडत नसल्याने तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आहार पुरवणाऱ्या प्रमुख स्वयंसाहाय्य गटाने १ ऑक्टोबरपासून आहार पुरवणे बंद केले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे २००० विद्यार्थी माध्यान्ह आहारापासून वंचित झाले आहेत.      

२००९ साली माध्यान्ह आहार योजना सुरू

शिक्षण खात्याने २००९ साली माध्यान्ह आहार योजना सुरू केली होती. त्यावेळी इयत्ता पहिली ते चौथीमधील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ५ रु. ११ पैसे, तर इयत्ता पाचवी ते आठवीमधील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ६ रु. ५० पैसे दराने रक्कम दिली जायची. त्यावेळी खिचडी, शिरा, भाजी पाव, पुलाव यांसारखे पदार्थ दिले जायचे. शिक्षण खाते देत असलेल्या पैशांतूनच पदार्थ तयार करणे आणि शाळांमध्ये आहार पोहोचवणे हे काम स्वयंसेवी संघटना करत होत्या.           

सरकारने २०१४ साली या रकमेत थोडा बदल करून इयत्ता पहिली ते चौथीच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे ६ रु. ११ पैसे व पाचवी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे ७ रु. ४५ पैसे दराने रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यावेळीही दर परवडत नसल्याने काही संस्थांनी ही जबाबदारी नाकारली होती. 

हेही वाचाःDrugs | ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक…

सरकारचा हा दर परवडत नाही

शिक्षण खात्याने आहारात बदल केला असून काबुली चणे, वाटाणे किंवा मुगाची भाजी, इडली, पुलाव, त्याचबरोबर पावाऐवजी चपाती देण्याचे सूचित केले आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे काबुली चण्याचा दर किलोमागे १२२ रुपये, मूग ८७ ते ९० रुपये, वाटाणे ६० ते ६२ रुपये इतका आहे. पावाचे दर वाढले आहेत. त्यात सदर आहार त्या त्या शाळेत पोहोचवण्यासाठी वाहने भाड्याने घ्यावी लागतात. त्यामुळे सरकारचा हा दर परवडत नसल्याचे ओंकार स्वयंसाहाय्य गटाच्या अध्यक्ष स्नेहा उर्फ संध्या दिनेश देसाई यांनी दिली.    

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!