लाच घेणारे दोघे पोलीस शिपाई निलंबित

दोघेही पणजी पोलीस स्थानकातील : अधीक्षकांचा आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: एका नागरिकांकडून करोना नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा करून दहा हजार रुपयांची लाच घेतल्यामुळे पणजी पोलीस स्थानकातील शिपाई आकाश नावेलकर आणि साईनाथ परब यांना निलंबित करण्यात आलं आहे. याबाबतचा आदेश उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी मंगळवारी रात्री उशिरा जारी केला आहे.

हेही वाचाः बांधकाम प्रकल्पामुळे नैसर्गिक झर प्रदूषित; आसगावात ग्रामस्थ आक्रमक

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं वाहनचालकाकडून मागितले 15 हजार

प्राप्त माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल आकाश नावेलकर आणि साईनाथ परब सोमवारी दोनापावला परिसरात गस्तीवर होते. मध्यरात्री त्यांना एक वाहन रस्ताच्या बाजूला उभे असल्याचं आढळून आलं. ते दोघे त्या वाहनाकडे गेले आणि गाडीत असलेल्या व्यक्तीची त्यांनी चौकशी केली. राज्यात करोना निर्बंध लागू असून त्या गाडीतील व्यक्तीने या नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा पोलीस शिपायांनी केला. यासाठी वाहनचालकाकडून १५ हजार रुपयांची मागणी केली. सामोपचाराने प्रकरण मिटवण्यासाठी त्या व्यक्तीकडून दहा हजार रुपये घेऊन त्याला जाऊ देण्यात आलं. या शिपायांनी ती रक्कम पोलीस खात्यात जमा केली नाही.

वाहनचालकाने उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नोंदवली तक्रार

दरम्यान, याबाबत संबंधित व्यक्तीला संशय आला. त्याने मंगळवारी उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या विषयी रितसर तक्रार करून सोमवारी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी अधीक्षक शोबित सक्सेना यांनी प्राथमिक चौकशी करून मंगळवारी रात्री उशिरा पणजी स्थानकातील पोलीस शिपाई आकाश नावेलकर आणि साईनाथ परब यांना निलंबित करणारा आदेश जारी केला आहे.

हेही वाचाः पुस्तकातील ‘तो’ वादग्रस्त भाग शिकवू नका!

भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं जाणार नाही

याबाबत अधीक्षक सक्सेना यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वरील वृत्ताला दुजोरा दिला. भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं जाणार नाही. असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हा व्हिडिओ पहाः Politics | Congress BJP & Goa Forward | निवडणुकीच्या तोंडावर भाजपला काँग्रेस धक्का देणार?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!