आमदार दोन…पण वालीच नाही कोण !

पेडणे तालुक्यातल्या विर्नोडा ग्रामस्थांची व्यथा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : पेडणे तालुक्यातील एकमेव विर्नोडा या पंचायतीला दोन लोकप्रतिनिधी आहेत. विर्नोडा पंचायत क्षेत्रात अमेय, भूत, वळपे मालपे या गावांचा समावेश आहे. ही पंचायत अर्धा भाग पेडणे मतदार संघात तर अर्धा भाग मांद्रे मतदार संघात समाविष्ट आहे. त्यामुळे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे व पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर या पंचायतीचे नेतृत्व करत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गामुळे या गावावर संकट आले असून अजूनही त्यावर समाधानकारक तोडगा दोन्ही लोकप्रतिनिधी आणि एक खासदार यांनी काढला नसल्याने आता ग्रामस्थांनाच आपले भवितव्य घडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. पंचायत मंडळाला पत्रकार परिषद घेवून आवाज उठवण्याची वेळ येत आहे.

एका बाजूने राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला खो किंवा आंदोलन केल्यास सरकार गुन्हा नोंदवू शकते, याची जाणीव आहेच. तरीही या रस्त्यामुळे भविष्यात गंभीर समस्या आणि रस्ताच डोकेदुखी ठरणार असल्याने आजी माजी पंचायत मंडळ, सरपंच, उपसरपंच, पंच, स्वातंत्रसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि नागरिक यांना रस्त्यावर येऊन या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी मागच्या वर्षी कृती समिती निवड करून जनजागृती केली होती. मात्र आजपर्यंत विर्नोडा जंक्शन समस्या सुटली नाही.

पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ कोलवाळ या राष्ट्रीय महामार्ग 64 चे काम युद्ध पातळीवर चालू आहे. रस्ता रुंदीकरणास कुणाचा विरोध नाही, कारण हा राष्ट्रीय प्रकल्प असल्याने नागरिकांचाही पाठिंबा आहे, परंतु सरकारने या रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी जमीन, शिवाय सर्विस रस्त्यासाठी जमीन संपादित न करताच मिळेल त्या ठिकाणी काम सुरू आहे. हा रस्त्या ज्या पंचायत क्षेत्रामधून जातो, त्या स्थानिक पंचायत, नागरिक आणि जमीन मालक यांनाही विश्वासात न घेता ठेकेदार काम करताना दिसत आहे. ठिकठिकाणी बेकायदा डोंगर कापून ठेकेदार निसर्गाचा ऱ्हास करताना दिसत आहे. काही ठिकाणी तर ठेकेदाराने डोंगर चोरुन नेण्याचा प्रकार घडलेला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे, मात्र रस्ता कसा असेल, त्याचा आराखडा कोणत्याही पंचायत कार्यालयात उपलब्ध नाही.

विर्नोडा जंक्शनकडे गावात जाण्यायेण्यासाठी भुयारी मार्ग आवश्यक होता, मात्र या ठिकाणी भुयारी मार्गाची तरतूद केलेली नाही. त्यामुळे केवळ विर्नोडा गावालाच नव्हे तर भूतवाडी, अमेय, वळपे आणि कातूर्ली तुये भागाला जबर फटका बसणार आहे. या भागात जाण्यासासाठी किंवा येण्यासाठी धारगळ सुकेकुळंण येथे जो भुयारी मार्ग आहे तिथुन दोन-चार किलोमीटर दूर प्रवास करावा लागेल. शिवाय शेती बागायतीतील शेतकऱ्यांना विनाकारण हाकेच्या अंतरावरून जाण्यासाठी मोठा फेर फटका मारावा लागणार आहे. आजही काही शेतकऱ्यांकडे पारंपारिक शेती नागरणीसाठी बैल जोडी आहे. या बैलांना नेणार कसे अशी गंभीर समस्या उपस्थित झाली आहे.

विर्नोडा जंक्शनवर भुयारी मार्गाची अत्यंत गरज आहे. त्याची निर्मिती झाली नाही तर गंभीर समस्याला तोंड द्यावे लागणार आहे. कोणतीही गोष्ट मागून मिळत नसेल तर ती लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनद्वारे मंजूर करून घेण्यासाठी आता ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याचा विचार करत आहेत.

पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या नागरिक आणि वाहनचालकाना डोकेदुखी ठरत आहे. दरदिवशी या रस्त्यावर अपघात होतो, नागरिक जखमी होतात आणि प्रशासन मात्र आजही सुस्त आहे. रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन अजूनपर्यंत संपादित केली नाही. सरकारच बेकायदा रस्ता करीत असल्याचा दावा करत २६ रोजी मंत्री दीपक पावसकर व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना जाब विचारला होता. आपल्या डोळ्यादेखत या रस्त्यावरील खड्ड्यात पडून नागरिक जखमी होतात. काहीजण मरण पावतात. जखमीच्या मदतीला स्थानिक धावून जातात. या रस्त्याच्या कामाविषयी ठेकेदाराला जाब विचारला तर ठेकेदार पोलीस स्टेशनवर जावून स्थानिक नागरिकांच्या विरोधात तक्रार नोंदवतात. पेडणे पोलीस शहानिशा न करताच गुन्हा नोंदवून त्याला पकडण्यासाठी राजकीय दबाव असल्यामुळे धावपळ करतात. लोकहितासाठी ठेकेदाराला जाब विचारला तर गुन्हा आणि आजपर्यंत या रस्त्यावर डझनभर नागरिक मृत्युमुखी पडले, त्याच्या विरोधात गुन्हा नाही.

या रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने त्यास ठेकेदार कारणीभूत आहे. खड्ड्यात पडून अपघात होतात आणि मनुष्य हानी होत आहे. आता पोलिसांनी ठेकेदारावर आणि शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

– सीताराम परब, माजी सरपंच

विर्नोडा पंचायत मंडळाने वाड्या-वाड्यावर जावून मागच्या वर्षी जनजागृती केली होती. विर्नोडा जंक्शन भुयारी मार्ग बनवला पाहिजे, अशी प्रमुख मागणी आजही आहे. विधानसभेच्या निवडणुकापूर्वी ही समस्या सुटली नाही तर येत्या निवडणुकीत आमदारांना धडा शिकवणार असल्याचा इशारा माजी सरपंच प्रशांत राव व पंच सदस्य शैलेंद्र परब यांनी दिलाय .

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!