बारावीच्या परीक्षा रद्द; बोर्डाकडून परिपत्रक जारी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ट्विट मेसेजद्वारे घोषणा; विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीटरच्या माध्यमाने बुधवारी रात्री उशीरा ही घोषणा केली. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आलंय. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगानेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटलंय.

बुधवारी सकाळी गोवा शालान्त बोर्ड तसेच शिक्षण खाते आदींची महत्वाची बैठक मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बोलावली होती. या बैठकीत बारावी परीक्षेच्या अनुषंगाने व्यापक चर्चा झाली. देशातील इतर राज्यांनी परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयांचाही या बैठकीत उहापोह झाला. केंद्र सरकारने सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने गोवा बोर्डाच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. केंद्राच्या निर्णयाची माहिती बुधवारी राज्य सरकारला अधिकृत पद्धतीनं प्राप्त झाल्यानंतर अखेर सरकारने हा निर्णय जाहीर केला. बारावीच्या परीक्षांबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे पालक, शिक्षक तथा विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहीले होते. सरकारने अखेर हा निर्णय जाहीर करून या उत्सुकतेला पूर्णविराम दिला. ऑब्जेक्टिव पद्धतीनं बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि ही पद्धत प्रचलित आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलंय.

गोवा विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा

गोवा विद्यापीठाच्या 8 जूनपासून सुरू होणार्‍या ऑनलाईन परीक्षा आता 21 जूनपासून सुरू होणार आहेत. अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा 1 जुलैपासून, तर एमबीए, एमबीए (एफएस) आणि एमसीएच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 21 जूनपासून होणार आहेत .या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. सगळ्या प्रलंबित आयएसए ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचेही गोवा विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!