बारावीचे निकाल दिलेल्या वेळेत वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे देणार !

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा यावर्षी होणार नाहीत - पंतप्रधान मोदी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविडमुळे निर्माण झालेली अनिश्चित परिस्थिती लक्षात घेऊन आणि त्याबद्दल विविध संबंधितांकडून आलेले अभिप्राय यांच्या आधारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा यावर्षी होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात  आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिलेल्या वेळेत वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल देण्यासाठी पावले उचलेल, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांसंबंधीचा निर्णय घेतला गेला आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. कोविड-19 मुळे शैक्षणिक वेळापत्रकावर चांगलाच परिणाम झाला. त्यामुळेच बोर्डाच्या परीक्षांसंबंधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता होती. त्याला आता पूर्णविराम देणे आवश्यक होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

कोविड संबंधी देशभरात वेगवेगळी परिस्थिती आहे. देशातील कोविड रुग्ण संख्या कमी होत आहे त्याच वेळी काही राज्ये लघु विलगीकरण विभागांद्वारे परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत, काही राज्यांमध्ये अजूनही  टाळेबंदी आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांनाच काळजी वाटणे स्वाभाविक आहे. या तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी सक्ती करणे योग्य नाही असेही पंतप्रधान म्हणाले.

आपल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा सर्वात महत्वाची आहे, यावर भर देत त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. आत्ताच्या परिस्थितीत तरुणांचे आयुष्य पणाला लावण्यासाठी  परीक्षा कारणीभूत  ठरू नये, असे त्यांनी सांगितले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!