देवी भगवती भगिनी पुनर्भेटीने तुये-पार्सेवासीय तृप्त

तुये- पार्से श्री देवी भगवती पावणेर उत्सव

Goan Varta Live | प्रतिनिधी

मकबुल माळगिमनी

पेडणे : पेडणे तालुक्यातील पार्से आणि तुये गावचे ग्रामदैवत श्री देवी भगवती या दोघी बहिणी आहेत. दर तीन वर्षांनी पार्सेची श्री देवी भगवती आपल्या तुयेतील भगिनीच्या भेटीला येते. या उत्सवाला पावणेर म्हणतात. दोन्ही गावांसाठीचा हा सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी भक्तांची श्रद्धा मात्र तीच आहे. 30 रोजी मध्यरात्री पार्सेहून निघालेली भगवती माऊली पहाटे आपल्या तुयेतील भगिनीकडे दाखल झाली. सोबत श्री देव रवळनाथाची तरंगे होती. 31 रोजी ही माऊली तुयेतील भगवती मंदिरात विसावा घेऊन संध्याकाळी निरोप घेऊन आपल्या मूळ स्थानी गेली.

गेल्या शेकडो वर्षांच्या परंपरेचा भाग म्हणून या उत्सवाची ख्याती आहे. बरीच वर्षे हा उत्सव बंद पडला होता. परंतु दोन्ही गांवच्या महाजनांनी एकत्र येऊन हा उत्सव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. हा उत्सव दोन्ही गावांसाठी एक मोठी पर्वणी असते. या सणानिमित्त दोन्ही गावांतील असंख्य भक्तगण देवीचा कौल आणि तरंगांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी करतात. या उत्सवानिमित्त पार्से आणि तुये गावांत ठिकठिकाणी विद्यत रोषणाई, रंगीबेरंगी रांगोळी घालण्यात येते. ढोल- ताशांच्या गजरात आणि खास बेंडबाजाच्या सहाय्याने ही मिरवणूक पार्सेतून रात्री बाराच्या ठोक्यावर निघते. गुरवाच्या डोक्यावर श्री देवी भगवतीचा कलश आणि सोबत तरंगे अशी ही मिरवणूक पारंपारिक मार्गाने निघते आणि वाटेत शेकडो सुवासिनी देवीची खणानारळाने ओटी भरतात. तुये येथे सीमेवर तुये ग्रामस्थांतर्फे कलश आणि तरंगांचे विधीवत स्वागत केले जाते आणि तिथून मोठ्या उत्साहात कलश आणि तरंगे तुये गावांत नेली जातात.

तरंगांच्या दर्शनाला उडते झुंबड

दुसऱ्या दिवशी सकाळपासून श्री देवी भगवती मंदिरात कलश आणि तरंगांच्या दर्शनाला एकच झुंबड उडते. यानिमित्ताने विविध धार्मिक विधी आयोजित केल्या जातात. तुये ग्रामस्थांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन यानिमित्ताने केले जाते. यंदा उत्साहावर करोनाच्या मार्गदर्शक तत्वांचा धाक आहे. पण तरीही उत्सवाचा जोश मात्र कायम आहे.

1. दर तीन वर्षांनी होतो उत्सव

2. पावणेर उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा

3. दोन्ही भगिनींच्या दंतकथेला मोठे महत्व

4. शिगमोत्सवात दोन्ही गावांच्या नातेसंबंधांची झलक

5. कौल- प्रसादासाठी शेकडो भक्तांची उपस्थिती

6. करोनामुळे यंदा साधेपणाने उत्सव

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!