मुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचा आव आणून क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न…

महाराष्ट्रातील व्यक्तीविरूद्ध पर्वरी पोलिसांत गुन्हा

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा भाऊ असल्याचा आव आणून क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या धैर्य नामक महाराष्ट्रातील संशयित व्यक्तीविरूद्ध पर्वरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही घटना नेरूल येथील क्लब एलपीके वॉटरफ्रन्टमध्ये दि. २० रोजी उत्तर रात्री १२ वा. घडली.
हेही वाचाःगोवन वार्ता लाईव्ह वेबसाईटच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त…

मुख्यमंत्र्यांचा फोन नंबरही संशयित देऊ शकला नाही

याबाबत क्लबचे सिक्युरीटी अ‍ॅण्ड सेफ्टी प्रमुख प्रविण रोझर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी क्लब एलपीकेच्या प्रवेश काऊंटरवर आला. आपण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा भाऊ असून क्लबमध्ये विनामुल्य प्रवेश आणि इतर सवलती देण्यास फिर्यांदींना प्रवृत्त केले. या बदल्यात भविष्यात कोणतीही मदत देण्याची आश्वासन त्याने दिले. संशयित गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी नातेसंबंध असल्याचे कोणतेही पुरावे व कागदपत्रे सादर करू शकला नाही. शिवाय मुख्यमंत्र्यांचा योग्य फोन नंबरही संशयित देऊ शकला नाही, आपल्या ओळखपत्राच्या पुराव्याशी संबंधित योग्य उत्तरही देण्यास असमर्थ ठरला. त्यामुळे त्यास फिर्यादींनी प्रवेश नाकारला.
हेही वाचाः’नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग’ होणार : देवेंद्र फडणवीस

फिर्यादी व कर्मचार्‍यांना दिली गंभीर परिणामाची धमकी

तेव्हा संशयिताने कर्मचार्‍यांशी वाद घातला व बळजबरीने क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी व कर्मचार्‍यांना गंभीर परिणामाची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी संशयिताविरूद्ध ४१९, ४२०, ४४७ , ५०६ (२) व ५११ कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस संशयिताचे योग्य नाव आणि ठावठिकाण्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे व निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाशी सलग्न असून त्यास पकडून अटक करण्यासाठी पोलीस पथक सातारा जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहे. 
हेही वाचाःछत्रपती शिवाजी क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे स्वच्छता मोहीम…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!