काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा…

दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीत केवळ त्या आठ आमदारांचा हात आहे, काँग्रेस पक्षाचा नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन पुन्हा एकदा पक्ष मजबूत करावा. पैसे देऊन आमदार खरेदी करणाऱ्या भाजपकडून लोकशाहीचा खून होत असल्याचे नागरिकांना पटवून द्यावे, असे दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे तीन आमदार हे लोकांचा आवाज बनतील. संख्याबळ नसले तरी चालेल पण पक्षाशी, लोकांशी प्रामाणिक राहणाऱ्यांना तिकीट देण्यात येईल. कार्यकर्ते हेच आमचे नेते असतील, असेही स्पष्ट केले.
हेही वाचा:मांद्रे ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव संमत, ‘यांची’ निवड निश्चित…

आमदारांचे पक्षांतर हा लोकशाहीचा खून

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीवेळी काँग्रेसचे आमदार गेल्याने पक्षाचे झालेले नुकसान भरून काढत पक्षाची यापुढील रणनीती ठरवण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, बिना नाईक, साविओ डिसिल्वा, ओलेंसिओ सिमोइस, कॅ. विरियातो फर्नांडिस आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेस नेते कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. त्यासाठी बैठक बोलावून काँग्रेसच्या काही आमदारांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांना लाज वाटली पाहिजे, कार्यकर्त्यांनी मनापासून पक्षाचे काम केले असल्याने त्यांनी कोणतीही लाज बाळगू नये, असे सांगण्यात आले. आमदारांनी केवळ काँग्रेस पक्षाचा घात केलेला नाही, कार्यकर्त्यांचा, लोकांचा व देवाचाही घात केवळ स्वार्थासाठी केलेला आहे. आमदारांचे पक्षांतर हा लोकशाहीचा खून आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत हा संदेश पोहोचवण्याची गरज आहे, पक्षातील काही आमदारांनी पक्षांतर केले यात पक्षाचा, कार्यकर्त्यांचा कोणताही दोष नाही. या सर्वांमागे भाजप हा मुख्य कारणीभूत आहे, कारण त्यांनीच आमदारांना पैसे देऊन विकत घेतले आहे, असा आरोपही केला.
हेही वाचा:स्थानिक भाषा समजणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच भरती करा !

पक्षाला पुन्हा मजबूत करण्याचा निर्णय

काँग्रेसमध्ये तिकीट देण्याची प्रक्रिया ही स्थानिक स्तरावर ठरते. पण, वरिष्ठ नेत्यांकडून त्याची घोषणा केली जाते. त्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कोणताही हात नसतो, ती जबाबदारी स्थानिक समितींची असते. यापुढे पक्षांतर केलेल्या आठजणांना पुन्हा आमदार बनू देणार नाही. लोकसभेबाबत चर्चा झालेली नाही. पण, पक्षाला पुन्हा मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष पुढे नेण्यात येणार आहे, असे बैठकीत ठरवण्यात आल्याचे कॅ. विरियातो यांनी सांगितले.
हेही वाचा:JOB VARTA | भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची संधी…

देवाची शपथ घेऊया हे कामतांनीच सुचवले होते : फर्नांडिस

पणजीतील हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीवेळी आमदार दिगंबर कामत यांनी देवाकडे शपथ घेण्याचे सुचवले होते. त्यावेळी आपण त्याला विरोध दर्शवत संविधानाची शपथ घेऊया, असे सांगितले होते. ज्यांनी देवाची शपथ घेऊया म्हणून सुचवले होते त्यांनी काँग्रेसचा नाही, तर देवालाही फसवले. भाजपकडून देशात केवळ एकच पक्ष असावा अशी कार्यपद्धतीने काम सुरू आहे. एकच पक्ष राहिल्यास सर्वसामान्याचा आवाज बंद होण्याची प्रक्रिया सुरू होते, असे कॅ. विरियातो फर्नांडिस म्हणाले.
हेही वाचा:Sonali Phogat | सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी गावकर, मांद्रेकर यांना सशर्त जामीन मंजूर…

आरजी, टीएमसी, आप हे भाजपचेच सहकारी : सिमोइस

आम आदमी पक्ष व रिव्हॉल्युशनरी गोवन्स हे पक्ष आमदार खरेदी केलेल्या भाजपविरोधात निदर्शने करत नाहीत. तर ते काँग्रेसविरोधात आंदोलने करत आहेत. आप, टीएमसी व आरजी हे पक्ष काँग्रेसची मते कमी करण्यासाठीच राज्यात आलेले होते. भाजपकडून लोकशाहीचा खून होत असतानाही हे पक्ष काँग्रेसला दोष देत आहेत. राज्यातील जी परिस्थिती सध्या आहे, ती केवळ या तीन पक्षांमुळे झालेली आहे. पक्षाकडूनही काही चूक झालेली असेल. यापुढील सर्व निवडणुकांमध्ये चांगले चेहरे काँग्रेसकडून देण्यात येतील, असे ओलेंसिओ सिमोइस यांनी सांगितले.
हेही वाचा:Accident | चीनमध्ये बसचा भीषण अपघात ; २७ प्रवासी ठार

कामत जातात तो पक्ष संपवतात : फर्नांडिस

मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई हे सर्व भाजपच्या विचारसरणीची मंडळी होती, त्यांना पक्षात घेण्याची चूक काँग्रेसकडून झाली. दिगंबर कामतही भाजपमधून आलेले आमदार होते. ज्या पक्षात आमदार कामत जातात, त्या पक्षाला संपवण्याचे काम कामत करतात. पाच वर्षांत काँग्रेस पक्ष बांधणीच्या नावाखाली लॉबिंग केले. विरोधी पक्षनेते पदही त्यांच्यामुळे काँग्रेसला गमवावे लागले. २०१७ मध्ये काँग्रेस सत्तेत येत असताना कामत यांनी आपण मुख्यमंत्री होत नसल्यास सरकार स्थापन करू नये, यासाठी प्रयत्न केले. या व्यक्तीने स्वार्थासाठी आयुष्यभर काम केलेले आहे, असेही कॅ. फर्नांडिस यांनी सांगितले.
हेही वाचा:Sport| राष्ट्रीय शुटिंग स्पर्धेसाठी ॲड. मेघश्याम भांगले ज्युरी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!