राजकारण बाजूला ठेवून गरजूंना मदत करा

गोवा काँग्रेस निरिक्षक दिनेश गुंडू राव यांचं पक्ष सदस्यांना आवाहन

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राजकारण बाजूसा ठेवून गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने कोविड बाधित लोकांसाठी काम करण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी एक आयुष्य वाचविण्यात तुम्ही यशस्वी झालात तरी ते खूप मोठं आहे, असं गोवा काँग्रेस निरिक्षक दिनेश गुंडू राव म्हणाले. गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या कोविड कंट्रोल रूम उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॉंग्रेस सदस्यांना संबोधित करत होते.

राजकारण बाजूला ठेवून कोविडविरुद्ध लढा

कॉंग्रेस नेते राहुल गांधी जी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे आणि आपण सर्वांनी कोविडविरुद्ध लढण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. संकटात सापडलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी इतर पर्याय शोधले पाहिजेत, असं दिनेश राव म्हणाले. तसंच कोविड कंट्रोल संघाच्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि जीपीसीसी संघाचं कौतुक केलं.

हेही वाचाः लॉकडाऊन वाढवणं गरजेचं नाही का?

जीएमसीत बेड क्षमता वाढवण्याची मागणी

कलेक्टरबरोबर या आधीच दोन बैठका झाल्या आहेत, ज्यात त्यांनी मोबाइल चाचणी सुविधा सुरू करण्यास सांगितलं असल्याचं विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बैठकीत भाग घेत पथकाला सांगितलं. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि जीएमसीमध्ये बेड क्षमता वाढविण्याची मागणी केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सहभागींना दिली.

राज्यातील इस्पितळात पुरेशा खाटा नाहीत

रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत. राज्य कोविड तसंच खासगी रुग्णालयांमध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा 25% जास्त काम करीत आहे. राज्यात अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना फरशी, खुर्च्या आणि स्ट्रेचरवर झोपायला लावलं जात असल्याची खंत जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली.

कोविड कंट्रोल रूमसाठी समाजातून पाठिंबा

पक्षाचे सदस्य बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतात तसंच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करू शकतात. कोविड कंट्रोल रूम उपक्रमासाठी आम्हाला समाजाकडून चांगला पाठिंबा आणि कौतुक मिळत असल्याचं जीपीसीसी कोविड नियंत्रण कक्षाच्या अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर कोविड कंट्रोल रूम सेटअपच्या कामकाजाबद्दल सहभागींना माहिती देताना म्हणाल्या.

युवा कॉंग्रेसचं ग्राऊंड लेव्हलवर काम

युवा कॉंग्रेस कोविड सेलशी योग्य समन्वय साधणार. युवा कॉंग्रेस सदस्य रुग्णालये आणि घरांना भेट देऊन आणि गरजूंना मदत देऊन ग्राऊंड लेव्हलवर काम करत असल्याचं युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकरांनी यावेळी नियंत्रण कक्ष सेटअपबद्दल माहिती देताना सांगितलं.

कोविड बाधितांच्या मदतीसाठी प्रयत्नशील

होम क्वारंटाइनमध्ये किंवा विलगीकरणात असलेल्यांना अन्नाची पाकिटं देण्याच्या कॉंग्रेस पक्षाचा प्रयत्न असल्याचं काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शंकर किर्लपालकर यांनी सदस्यांना सांगितलं. तसंच या बैठकीत सहभागी झालेल्या महिला कॉंग्रेसप्रमुख बीना नाईक यांनी गरजूंना मदत देण्याच्या त्यांच्या संघांच्या; विशेषत: स्त्रियांच्या प्रयत्नांची माहिती दिली.

हेही वाचाः CORONA UPDATE | बापरे! देशात 24 तासांत ३ हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

जीपीसीसीचे उपाध्यक्ष एम. के. शेख आणि विठोबा देसाई, एव्हर्सन व्हॅलेस आणि इतर सदस्यांनी या बैठकीत भाग घेतला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!