सच्चा मराठी प्रेमी उत्तम कोटकर यांचे निधन

अल्प आजाराने निधन; तालुक्यातून हळहळ व्यक्त

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: श्री भगवती हायस्कूलचे संस्थापक चेरमेन उत्तम कोटकर यांचं १४ रोजी अल्प आजाराने निधन झालं. एक सच्चा मराठी प्रेमी, शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्यानं भगवती हायस्कूल परिवाराला अतीव दुख झालं आहे. सफेद सदरा-लेंगा परिधान करणारा साधा स्वच्छ प्रतिमेचा कोटकर गेल्यानं नागरिक दुःख व्यक्त करताहेत. तालुक्या शेजारील सिंधुदुर्गातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी ते कार्यरत होते. शिक्षणाबरोबरच कलेला प्राधान्य देणारे, मराठीसाठी सत्तात लढणारे, मराठीचे कार्यक्रम असले की निमंत्रणाची वाट न पाहता ते हजर असायचे, बोलण्यापेक्षा ते कृती करायचे.

हेही वाचाः काँग्रेसकडून नवीन मीडिया विभागाची नियुक्ती

श्री भगवती हायस्कूलची स्थापना

पदरी शिक्षण कमी, मात्र आपल्या तालुक्यातील मुलं सुशिक्षित झाली पाहिजेत, त्यांना घर बसल्या शिक्षण मिळायला हवं, त्यासाठी उत्तम कोटकर यांनी पेडणे पालिका क्षेत्रात राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याकडून हायस्कूल सुरू करण्यासाठी परवानगी घेतली आणि श्री भगवती हायस्कूलची स्थापना केली आणि ते आजही कार्यरत आहे.

हेही वाचाः अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले

कोटकरांच्या मार्गदर्शनाखाली ‘शंभू राजे’ महानाट्याची निर्मिती

राज्यातील पहिल्या हायस्कूल मधील ५२० विद्यार्थ्यांना घेऊन ‘शंभू राजे’ या महानाट्याची निर्मिती उत्तम कोटकरांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. या महानाट्याचे राज्यात ठिकठिकाणी प्रयोग झाले होते. पेडणे तालुक्यात आणि गोव्यात प्रथमच मोकळ्या रंगमंचावर ५२० कलाकारांना घेऊन पेडणे भगवती हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी जे शंभूराजे महानाट्य सादर करून एक नवा इतिहास घडवला, त्या सर्व कलाकारांचं आणि सर्व रंगमंचावरील आणि बाहेरील कलाकारांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यासोबतच या महानाट्याचे ठिकठिकाणी प्रयोग व्हावेत यासाठी कोटकर यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी कला संकृती खात्याचे मंत्री गोविंद गावडेंनी त्यांना सहकार्य केलं होतं. कोटकरांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक कलाकाराने आपलं १०० टक्के योगदान देऊन हा प्रयोग यशस्वी केला. या महानाट्यात शिवाजींचा डबिंग आवाज आणि संवाद खुद्द कला मंत्री गोविंद गावडेंचा होता. ते या नाटकाच्या प्रथम प्रयोगाला उपस्थित होते. त्यांना प्रयोग मनापासून भावाला आणि त्यांनी लगेच आयोजकांना कला अकादमीत बोलावून या नाटकाचे इतरत्र प्रयोग व्हावेत यासाठी कला संस्कृती खात्याचं सहकार्य मिळवून देणार असल्याचं सांगितलं.

पालक शिक्षक संघाला श्रेय

भगवती हायस्कूल पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार विनोद मेथर यांची निवड झाल्यानंतर आणि योगायोगाने यंदाचं वर्षं हे शिक्षण मंडळाचं सुवर्णमहोत्सवी वर्षं असल्यानं पालक शिक्षक संघाने जास्त करून अध्यक्ष विनोद मेथर यांनी आपल्या व्यवसायावर तीन महिन्यापेक्षा जास्त दुर्लक्ष करीत महानाट्य यशस्वी करण्यासाठी तन मन धन अर्पून काम केलं. दिवस-रात्र एक करून फक्त पेडण्यातच नव्हे, तर संपूर्ण गोव्यात या महानाट्याद्वारे एक इतिहास रचण्यात पालक संघटना यशस्वी झाली होती आणि आता चेरमेन कोटकर यांचं निधन झाल्यामुळे पालक शिक्षक संघाने दुःख व्यक्त केलं.

विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

उत्तम कोटकर यांचं निधन झाल्याची वार्ता कळतात पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावास, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, माजी मंत्री संगीता परब, युवा उद्योजक सचिन परब, मागो नेते जीत आरोलकर, मुख्याध्यापक केशव पणशीकर, विक्रमादित्य पणशीकर, तुकाराम शेट्ये, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर, पेडणे पत्रकार समिती, सदानंद वायंगणकर, भारत बागकर, जगनाथ सावंत, देवेंद्र प्रभुदेसाई, दयानंद मांद्रेकर, व्यंकटेश नाईक, दादू परब, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, प्रसाद गवंडी, नगराध्यक्ष उषा नागवेकर, अजय कलंगुटकर, पत्रकार किशोर नाईक गावकर, प्रसाद ताटकर, रुद्रेश नागवेकर श्याम आसोलकर, सुर्यकांत साळगावकर, श्याम आसोलकर, व्यंकटेश घोडगे आदी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!