फोंड्यात आदिवासी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे आयोजित राज्यस्तरीय आदिवासी क्रीडा महोत्सव २०२३ च्या ८ व्या आवृत्तीला गुरुवारी फोंडा क्रीडा संकुलात सुरुवात झाली. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, टग ऑफ वॉर आणि लंगडी, लगोरी हे पारंपरिक खेळ संपन्न होणार आहेत.

‘ईगल’ या शुभंकराचे अनावरण
उद्घाटन समारंभात यंदाच्या ‘ईगल’ या शुभंकराचे अनावरण करण्यात आले. क्रीडा महोत्सवाच्या माहितीपत्रकाचेही प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात अधिकाऱ्यांसह १२ तालुक्यांतील २,००० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.
प्रत्येक व्यक्तीमध्ये खेळाची भावना असली पाहिजे
उद्घाटन समारंभात बोलताना क्रीडा व आदिवासी मंत्री गोविंद गावडे यांनी सहभागी स्पर्धकांच्या कलागुणांचे अभिनंदन केले. “करिअरच्या सुरुवातीला अपयशाचा सामना करणारा खेळाडू त्याच्या विजयाची नेहमीच कदर करतो. खरा खेळाडू नेहमीच मैदानावर शेवटच्या सेकंदापर्यंत त्याच्या विरोधकांना पराभूत करण्यासाठी लढत असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये खेळाची भावना असली पाहिजे जी व्यक्ती जीवनातील कोणत्याही अडथळ्यांना तोंड देण्यास सक्षम करते असे ते म्हणाले.

गोव्यातील आदिवासी समाजाचे उत्थान करण्याचा उद्देश
पुढे बोलताना क्रीडा मंत्र्यांनी या आदिवासी क्रीडा महोत्सवामागे क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान गोव्यातील आदिवासी समाजाचे उत्थान करण्याचा उद्देश आहे असे सांगितले. कोणत्याही संबंधित क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी ३ ते ५ टक्के सरकारी नोकरीचा कोटा राखीव ठेवला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
गोवा प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन
कृषीमंत्री रवी नाईक यांनी दुर्बल समाजासाठी फायदेशीर ठरेल अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल गोवा प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि दोन दिवसीय महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल स्पर्धकांचे अभिनंदन केले.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार
उद्घाटनप्रसंगी विविध क्रीडा खेळांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी इतर मान्यवरांमध्ये गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालिका डॉ. गीता नागवेकर, एसएजीचे संचालक रोहित कदम, अर्जुन पुरस्कार प्राप्त ब्रुनो कुतिन्हो आणि इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.
