बार्देशमध्ये सतंतधार पावसामुळे पडझड

उसकई तलाठी कार्यालयाच्या छताचा तुकडा कोसळला

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः मागील तीन दिवस कोसळणार्‍या सतंतधार पावसामुळे बार्देश तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने लोकांचं नुकसान झालं असून उसकई पंचायतीच्या तलाठी कार्यालयाचा छताचं काँक्रीट कोसळून पडण्याची घटना घडली.

हेही वाचाः नोकरभरती बंदीचा मी खलनायक नाही!

बार्देश तालुक्यात 11 ठिकाणी कोसळली झाडं

बुधवारी बार्देशमध्ये अकरा ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. म्हापसा अग्नीशमन दलाच्या कार्यक्षेत्रात 9 तर पिळर्ण अग्नीशमन दलाच्या कार्यक्षेत्रात दोन घटनांचा समावेश आहे. म्हापसा, गांवसावाडा, गिरी चॅपेल जवळ, हळदोणा, सडये शिवोली, सांगोल्डा, वेर्ला काणका, पर्रा, हडफडे आणि कामुर्ली तसंच कांदोळी आणि बागा येथे पडझड झाली. गावसावाडा येथे संरक्षण भिंतीवर झाड कोसळल्याने 10 हजारांचं नुकसान झालं. सांगोल्डा येथे एका घरावर झाड कोसळून 50 हजारांचं नुकसान झालं. कांदोळी येथे घरावर झाड पडून नुकसान झालं. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही झाडं कापून बाजूला केली. शिवाय जागोजागी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. वीज वाहिन्यांवर झाडं पडल्यानं खंडीत झालेला वीज पुरवठा वीज कर्मचार्‍यांनी सुरळीत केला, अशी माहिती मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी दिली.  

हेही वाचाः चिखलात उभं करून बसस्थानक प्रमुखांना दिलं निवेदन !

तलाठी कार्यालयाचा काँक्रिटचा भाग कोसळला

दरम्यान पुनोळा उसकई येथे असलेल्या तलाठी कार्यालयाचा काँक्रिट भाग कोसळण्याची घटना घडली. छतावर पावसाचं पाणी तुंबल्याने हा प्रकार घडला. गेल्या अनेक वर्षांपासून दुरूस्ती अभावी ही तलाठी कार्यालयाची इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली आहे. याबाबत उसकई पालये पुनोळा पंचायतीचे सरपंच आनंद गडेकर यांनी सांगितलं, सदर इमारत जुनी असून धोकादायक स्थितीत आहे. गुरूवारी पंचायत मंडळाची बैठक असून या बैठकीत सदर इमारत दुरूस्ती संदर्भातील ठराव मंजुर केला जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!