गोंयकारांच्या आदरातिथ्याला लागली ओहोटी?

ट्रॅवल रिव्ह्यू अॅवार्ड-2021 मध्ये केरळ अव्वल

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजी : जगभरात आदरातिथ्यामुळे आपली वेगळी ओळख बनली आहे खरी;पण गोंयकारांच्या आदरातिथ्याला ओहोटी लागलीय की काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा असंच काही तरी घडतंय. ट्रॅवल रिव्ह्यू अॅवार्ड-2021 ची घोषणा झालीय. यात केरळ राज्य सातत्याने तिसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर झळकलंय. आपला गोवा राजस्थाननंतर तिसऱ्या स्थानावर आलाय, तर आपल्यामागे कर्नाटक आणि तामिळनाडूचा समावेश झालाय.

आदरातिथ्य आणि फ्रेंडलीनस (स्नेहभाव) या निकषांवर ट्रॅवलिंग पोर्टल बुकींग डॉट कॉम यांच्याकडून दरवर्षी हे पुरस्कार जाहीर केले जातात. देशातील वेगवेगळ्या राज्यांत पर्यटक कुठले स्थळ पसंत करतात आणि कुठे बुकींग करतात या आधारावर हे पुरस्कार निश्चित केले जातात. गेली तीन वर्षे केरळ आपले अव्वल स्थान अबाधीत ठेवून आहे. करोना महामारीच्या या काळात पर्यटन उद्योगावर प्रचंड परिणाम झाला असला तरी ह्या महामारीवरही मात करून केरळने आपलं अढळ स्थान कायम ठेवलंय.

नैसर्गिक सौदर्य आणि इको- टूरीझमचा डंका

केरळच्या यशात या राज्याने राखून ठेवलेल्या नैसर्गिक सौदर्याचा महत्वाचा वाटा आहे. गोव्यात एकीकडे विकास आणि वेगवेगळ्या विकासात्मक प्रकल्पांच्या नावे नैसर्गिक सौदर्याची हानी सुरू असताना केरळने मात्र विकासात नैसर्गिक सौदर्याला कुठेच बाधा येणार नाही, याची काळजी घेतलीय. इथल्या नैसर्गिक सौदर्याला भाळूनच इथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याचे या पाहणीत आढळून आलंय. दुसरी गोष्ट नैसर्गिक सौदर्य अबाधित ठेवून त्याच्यातूनच नव्या पर्यटन उद्योगाला चालना मिळवून देण्यात इथल्या इको- टूरीझम प्रकल्पांनी भर घातलीय. या इको- टूरीझम प्रकल्पांना चांगली लोकप्रियता लाभते आहे. काही ठरावीक पर्यटन स्त्रोतांवरच अवलंबून न राहता पर्यटनात विविधता आणण्यात केरळ यशस्वी बनलंय आणि म्हणूनच केरळनं आपल्या लोकप्रियतेचा चढता आलेख कायम ठेवण्यात यश मिळवलंय. केरळनं आपला ग्रामिण साज तसाच जपून ठेवलाय. अंतर्गत भागात पर्यटनाला भरभराटी मिळतेय आणि हिंटरलॅण्ड टूरीझमची एक वेगळीच ओळख केरळने बनवलीय. या व्यतिरीक्त बीच टूरीझम तसेच मंदिरे आणि चर्चेस हा केरळच्या पर्यटनाचा अविभाज्य घटक तसाच कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवलंय.

आखाती देशात बहुतांश केरळीयन लोक वास्तव्य करतात. या देशांसोबत अनोखा संबंध या राज्याने प्रस्तापीत करतानाच आता पर्यटन उद्योग हाच राज्याच्या महसूलाचा प्रमुख स्त्रोत बनवून या राज्याने आपली भरभराट सुरू ठेवलीय. देशातील सर्वांधिक पंसतीचे मेडिकल टूरीझम डेस्टीनेशन म्हणूनही केरळने आपली वेगळी ओळख बनवलीय. पश्चिमात्य औषधी तसेच कोट्टकल आयुर्वेदा ही त्यांची ताकद बनलीय.

वास्को द गामाची दफनभूमी

पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याने समुद्रमार्गे भारताचा शोध लावल्यानंतर तो पहिल्यांदा केरळच्या भूमिवर उतरला. या पोर्तुगीजांच्या वारशाचे अनेक दाखले केरळ अजूनही जपतंय. कोची किल्ल्यावर अजूनही सेंट फ्रान्सिस चर्च आहे. वास्को द गामा याचे निधन झाल्यानंतर त्याचे शव याठिकाणी दफन केले होते. 14 वर्षानंतर त्याचे शव तिथून काढून लिस्बनला नेण्यात आले. डच, पोर्तुगीज, इंग्लीश तसेच मल्याळी संस्कृतीचे अनेक कंगोरे इथे पर्यटकांना पाहायला मिळतात.

पाळोळे आणि आगोंद किनारे अव्वलच

गोवा तिसऱ्या स्थानावर असला तरी दक्षिण गोव्यातील पाळोळे आणि आगोंद ही समुद्र ठिकाणं आपलं अव्वल स्थान कायम राखून आहेत. या ठिकाणांवर सर्वांधिक लोकांची बुकींगसाठी पसंती असते. यानंतर केरळचं मरारीकुलम, राजस्थानचं जैस्लामेर आणि पुन्हा केरळच्याच थेक्काडी या ठिकाणांचा क्रमांक लागतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!