मुंबई ते गोवा प्रवास होणार सुस्साट!

5 जूनपासून धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुंबई ते गोवा प्रवास आता वेगवान होणार आहे. मुंबईतून गोवा केवळ ६ तासात गाठता येणार आहे. वेगवान प्रवासाबरोबरच प्रवासांना सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस जून महिन्यापासून धावणार आहे. 3 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या हस्ते या एक्सप्रेसचं व्हर्च्युअल उद्घाटन होणार आहे. मडगाव रेल्वे स्टेशनवर केंद्रीय रेल्वेमंत्री या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असून 5 जूनपासून वंदे भारत एक्सप्रेस नियमीत प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.

वंदे भारतचे गोव्यातील थांबे आणि वेळापत्रक

वंदे भारत एक्सप्रेसचं वेळापत्रक समोर आलंय. या वेळापत्रकातील माहितीनुसार गोव्यात ‘वंदे भारत’चे मडगाव आणि थिवी असे दोन थांबे असणार आहेत. ही ट्रेन सकाळी 5.35 वा. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून निघेल, जी ठाणे येथे सकाळी 6.05 वा, पनवेल 6.40 वा. ,खेड 8.40 वा., रत्निगिरी 10 वा. , तर मडगावात दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. पुन्हा मडगावतून ही ट्रेन दुपारी 2.35 वाजता मुंबईसाठी निघेल, रात्री 10.35 मुंबईत दाखल होईल.

१६ मे रोजी चाचणी

वंदे भारत ट्रेनची १६ मे रोजी चाचणी करण्यात आली. त्यानंतर आता याला अंतिम रुप देणं अजून बाकी आहे. जूनमध्ये ही एक्स्प्रेस धावणार आहे. तेजस एक्स्प्रेसपेक्षाही वेगानं ही ट्रेन जाणार आहे. मुंबई -गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत ही सर्वात वेगवान ट्रेन आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई ते मडगाव स्थानकांमध्ये आठ ते नऊ तास लागत होते. आता हे अंतर सहा ते सात तासात गाठता येणार आहे.

तिकीट किती?

वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकीटाविषयी कोणतीच अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही. मात्र साधारण ११०० ते २९०० पर्यंत या एक्सप्रेसचं तिकीट असल्याचं सांगितलं जातंय. क्लासनुसार तिकीटात बदल होणार आहेत. या ट्रेनचं बुकिंग कसं करता येणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!