मंत्र्यांशी फारकत घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?

कायद्याच्या मार्गाने जाणाऱ्यांना कमी दर्जाची पदं, अवेटींग पोस्टिंग

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मंत्र्यांचे आदेश झिडकारणं, मंत्र्यांनी सांगितलेल्या नियमबाह्य गोष्टी अमान्य करणं, फाईल्सवर कायद्याच्या तरतुदीनुसार नोटींग्स लिहिणं, गोवा सरकारच्या कामकाज नियमांप्रमाणे वागणं अशा कारणांमुळे राज्य नागरी सेवेतील (जीसीएस) अनेक वरिष्ठ अधिकारी सरकारचा रोष ओढवून घेतायत. अशा अधिकाऱ्यांना कमी दर्जाची पदं किंवा ‘अवेटींग पोस्टिंग’ पहावी लागतेय. काहींना तर दर काही दिवसांच्या फरकाने बदल्या पहाव्या लागतायत. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत ४० वेळा नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघालेत. या दोन वर्षांच्या कालावधीतच कित्येक अधिकाऱ्यांच्या वाट्याला चार ते पाच वेळा बदल्या आल्या.

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

अधिकाऱ्यांचा वारंवार बदल्या

अरविंद बुगडे यांना दोन वर्षांत हस्तकला व वस्त्रोद्योग खाते, मुरगाव मुख्याधिकारी, खाण खाते व पुन्हा हस्तकला खाते अशी वारंवार बदली पहावी लागलीये. आशुतोष आपटे यांना राज्य निबंधक खाण खाते, अतिरिक्त तुरूंग महानिरीक्षक व पुन्हा राज्य निबंधक अशा बदल्या पहाव्या लागल्यात, संजीव गडकर यांना पर्यटन खाते, मोपा भूसंपादन अधिकारी, संजीवनी कारखान्याचे प्रशासक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य अधिकारी अशा वेगळ्यावेगळ्या पदांवर काम पहावं लागलं. दीपक बांदेकर यांना वाणिज्य कर उद्योग, शिष्टाचार खाते आणि आता माहिती प्रसिद्धी खाते; विकास गावणेकर यांना उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी, राज्य सहकार निबंधक, मानवाधिकार आयोग सचिव आरोग्य खात्याचे अतिरिक्त सचिव अशी पदे पहावी लागली. आग्नेल फर्नांडिस यांना एसटी वित्त महामंडळ, दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी, मडगाव मुख्याधिकारी, जीएसआयडीसीचे भूसंपादन अधिकारी; नारायण गाड यांना माहिती प्रसिद्धी भूसंपादन खाते, पंचायत संचालक, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा बदल्या पहाव्या लागल्या. बिजू नाईक यांना राज्यपालांच्या संयुक्त सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रशासकीय संचालक, मडगाव मुख्याधिकारी, सहकार निबंधक आणि सर्वसाधारण प्रशासनाच्या संयुक्त सचिव अशा बदल्या वाट्याला आल्यात. बिजू नाईक यांच्यानंतर सर्वाधिक बदल्या प्रसन्न आचार्य यांनी पाहिल्या. खाण संचालक, अतिरिक्त जिल्हाधिकारी, रवींद्र भवन सदस्य सचिव, अवेटींग पोस्टिंग, मडगाव रवींद्र भवन सदस्य सचिव, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि राजभाषा संचालक पदांवर आचार्य यांनी काम पाहिलं. पराग नगसेकर यांना सर्व शिक्षा अभियान, समाज कल्याण खाते, आयडीसी भूसंपादन अधिकारी, कला अकादमी, कोकणी अकादनाचे सचिव अशा वेगवेगळ्या खात्यांमधून प्रवास करावा लागला. गुरुदास पिळर्णकर यांचा कला संस्कृती खाते, कला अकादमी, तुरूंग महानिरीक्षक, नगरविकास खाते असा प्रवास सुरू आहे.

राजकीय नेत्यांमुळेच वारंवार बदल्या

एका बाजूने सरकार दिल्लीतून येणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगली वागणूक देतेय आणि दुसऱ्या बाजूने राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा बदल्या करत आहे. राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना बहुतांश वेळा राजकीय नेत्यांमुळेच वारंवार बदल्यांना सामोरं जावं लागतंय.

अधिकाऱ्यांच्या संघटनेचे अन्यायावर मौन

दिवंगत नेते मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना ज्या मंत्र्यांचे लाड खपवून घेतले जात नव्हते त्यातील काहीजणांना डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर पंख फुटले. काही मंत्री तर अधिकाऱ्यांना अगदीच खालच्या स्तराची वागणूक देतायत. कित्येक मंत्री वारंवार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वाक्षरीने नोट पाठवतात. मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून आपली दुसऱ्या ठिकाणी बदली करून घेतली. दरम्यान राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांवर अन्याय होत असतानाही अधिकाऱ्यांची संघटना मात्र गप्प आहे.

हेही वाचा – दुसरी लाट नाही तर काय? 24 तासांत तब्बल 90 हजार नवे रुग्ण, 250पेक्षा जास्त मृत्यू

स्थिरता नसल्याने प्रशासन डळमळीत

एका खात्याचे प्रशासन समजून घेण्यासाठी पुरेसा वेळही न देता सरकारच्या कार्मिक खात्याने अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. हल्लीच स्मार्ट सीटीचे मुख्य अधिकारी म्हणून गोमंतकीय अधिकारी श्रीनेत कोठावळे यांची मुख्यमंत्र्यांनी केलेली नेमणूक एका लॉबीच्या दबावामुळे मागे घेण्यात आली.

प्रसन्न आचार्य, अरविंद बुगडे, संजीव गडकर, दीपक बांदेकर, डॅरीक नेटो, आग्नेल फर्नाडिस, विजू नाईक, नारायण गाड, विकास गावणेकर, पराग नगर्सेकर, गुरुदास पिळर्णकर, आशुतोष आपटे, मेघना शेटगांवकर अशा अनेक अधिकाऱ्यांच्या दोन वर्षातच तीन ते चार वेळा बदल्या झाल्यात.

या गोष्टीमुळे राज्याचे प्रशासन सध्या डळमळीत झालेय. एकही अधिकारी आपल्या पदावर काही महिनेही स्थिर राहून व्यवस्थित काम करू शकत नाही, असाच अनुभव अधिकान्यांना येतोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!