कळंगुट, बागात येताय? मग इकडे लक्ष असू द्या!

वाढत्या पर्यटकांची संख्या पाहता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यात नववर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. विशेष करून उत्तर गोव्यातील कळंगुट आणि बागा ही दोन लोकप्रिय ठिकाणं असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची झुंबड उडते. डिसेंबरच्या अखेरीस या भागात सगळीकडूनच लोकांचे तांडे येत असल्याने वाहतूकीची कोंडी होऊन स्थानिकांसह पर्यटकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. ह्याच पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने विशेष सुचना जारी केल्यात.

वाहतूक विभागाने जारी केलेल्या सुचना आदेशात खालील ठिकाणी 30 डिसेंबर 2020 ते 3 जानेवारी 2021 पर्यंत एकेरी वाहतूक जाहीर केलीय

1- सेंट आलेक्स चर्च ते कळंगुट- बागा जंक्शन व्हाया सेंट एन्थोनी चॅपेल
2- बागा- कळंगुट जंक्शन ते सरकारी प्राथमिक शाळा
3- सरकारी प्राथमिक शाळा ते फॅट फिश जंक्शन
4- ज्यो दे मार रिसोर्ट ते पिएती चॅपेल
5- सीसीटी कडून ला कॅलिप्सो जंक्शनकडे येण्यास वाहतूकीला मज्जाव. त्यांना हडफडे पुलामार्गे जावे लागेल.

ह्या काळात वरील ठिकाणी सर्व अवजड, मध्यम(बसेस, मिनी बसेस, टेंपो) यांना निर्बंध जारी केले आहेत. त्यांना आपली वाहने कळंगुट- बागा बाहेर पार्क करावी लागतील.

खालील ठिकाणी पर्यटन वाहनांसाठी कळंगुट आणि हडफडे पंचायतीच्या परवानगीने तात्पूरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय.

1- सॅटर्डे नाईट बाजाराच्या खुल्या जागेत

2- कळंगुट येथील बोडके वडाकडे, परबवाडा येथील खुल्या शेतात

3- कळंगुट येथील पोरीयात क्रॉसकडे

4- बागा येथे हममरीज क्लबजवळ प्रदीप सहानी यांच्या खुल्या शेतात

5- सिकेरी येथील हॅलिपडच्या पार्किंग जागेत

सर्वांनी या काळात वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. निश्चित केलेल्या ठिकाणीच आपली वाहने पार्क करावीत जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य आहे, असे आवाहन उत्तर गोवा वाहतूक विभागाचे पोलिस उपअधिक्षक एस.एम.सलिम यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!