मार्केट बंद ठेवण्यास एसजीपीडीएतील व्यापाऱ्यांचा विरोध

बुधवारी सकाळी मार्केटच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेली बॅरिकेड्सही हटवली

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव :  सीझेडएमपीची जनसुनावणी ८ जुलै रोजी एसजीपीडीएच्या भाजी मार्केटनजीक आयोजित करण्यात आलेली आहे. या सुनावणीसाठी मार्केट दोन दिवस बंद ठेवण्यास मार्केटमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत बुधवारी सकाळी मार्केटच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेली बॅरिकेड्सही हटवली.

हेही वाचाः गुणाजी मांद्रेकर यांना ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ जाहीर

मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दोन दिवस मार्केट बंद ठेवण्याच्या निर्णयाला विरोध

एसजीपीडीएच्या मैदानावर जनसुनावणी होणार असल्याने मंडप उभारणीचं काम सुरू आहे. बुधवारी सकाळी मार्केटमध्ये येण्याच्या वाटांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसंच मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याबाबत एसजीपीडीएकडून कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दोन दिवस मार्केट बंद ठेवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला. तसंच मार्केटमधील येण्याच्या वाटांवरील बॅरिकेड्स हटवले. मार्केट बंद ठेवण्याबाबत एसजीपीडीएकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागवलेला माल खराब होऊ शकतो तसंच दोन दिवस मार्केट बंद ठेवल्यास आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. त्यामुळे राज्य सरकारने जनसुनावणी दुसऱ्या जागेवर घ्यावी किंवा व्यापाऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचाः उतोर्डा येथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

एसजीपीडीएकडून याबाबत नोटीस नाही

मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर फातोर्डा पोलिस निरीक्षक कपिल नायक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं. तसंच जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत एसजीपीडीए मार्केट दोन दिवस बंद ठेवण्याबाबत निर्णय झाला असल्याचं सांगितलं. एसजीपीडीएकडून याबाबत नोटीस देणं गरजेचं होतं. मात्र, सध्या मार्केटमध्ये येणार्‍या वाटा बंद करण्यात येणार नाहीत, असं आश्वासनही व्यापाऱ्यांना दिलं. संध्याकाळी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी मार्केटमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. त्यावेळी व्यापाऱ्यांना त्यांचं मत मांडण्यास सांगण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!