पर्यटकांची मौजमजा येणार अंगलट!

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
पणजी : पर्यटकांकडून सरकारच्या सूचनांना करोना महामारीच्या काळातही फारसे गांभीर्याने घेतले जाताना दिसत नाही. करोनासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सरकारने मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा आदेश काढला होता. पोलिस व संबंधित क्षेत्रातील पंचायतींना ही कारवाई करण्याचे अधिकार दिला होता. मात्र त्यांच्याकडूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा धोका आहे.
सध्या समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे जीवरक्षक या पर्यटकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना करत असतानाही त्याला किंमत दिली जात नाही. गेल्या सहा महिन्यापासून गोव्यात येण्यासाठी उत्सुक असलेल्या या पर्यटकांनी जीवाची मौजमजा करताना करोना महामारी अजूनही अस्तित्वात आहे व त्याचा संसर्ग होऊ शकतो, याचे भान ठेवलेले नाही. राज्यातील प्रशासन व कारवाई करणारी यंत्रणा सुस्त बनली आहे.
पोलिस घेतात बघ्याची भूमिका
समुद्रकिनारी असलेली खाद्यपदार्थ, रेडिमेड कपड्यांची तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये हे पर्यटक जातात. हे पर्यटक करोनामुक्त आहेत की नाही, याची काहीच माहिती नसते. ते तोंडाला मास्क न लावताच फिरतात, मात्र कारवाई केली जात नाही. त्या परिसरात असलेले पर्यटन पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत असताना दिसतात. या पर्यटकांना धाक दाखविला जात नसल्याने त्यांचे फावले आहे.
स्थानिकांकडून संताप व्यक्त
राज्य सरकार करोना महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना पर्यटकांची होणारी गर्दी तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या पर्यटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जात नसल्याने समुद्रकिनारी भागातील स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.