पर्यटकांना घरे भाड्याने देण्यासाठी नोंदणी सक्तीची!

बाबू आजगावकर : घरे, खोल्या भाड्याने देणाऱ्या व्यावसायिकांनी पर्यटन खात्याकडे नोंदणी करावी. यात राज्याचे व व्यावसायिकांचेही हीत.

यश सावर्डेकर | प्रतिनिधी

पेडणे : पर्यटकांना अनधिकृतपणे भाड्याने घरे, खोल्या देणारे व्यावसायिक व हॉटेलना पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. यावर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgaonkar) यांनी सांगितले.

पर्यटन व्यवसायात सुसूत्रता यावी व सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही कमतरता राहू नये, या उद्देशाने पर्यटन खात्याने हा नियम लागू केला आहे. पर्यटकांना भाड्याने घरे, खोल्या देणाऱ्यांच्या विरोधात पर्यटन खाते नाही. उलट पर्यटनवृद्धी व्हावी व पर्यटनातून रोजगार निर्मिती व्हावी, स्थानिकांचा उदरनिर्वाह चालावा, अशी आमची भूमिका आहे, असे आजगावकर यांनी सांगितले.

संबंधित हॉटेलची किंवा भाड्याने घरे देणाऱ्या व्यावसायिकांची ट्रॅव्हल पोर्टलवर बुकिंग करण्यासाठी पर्यटन खात्याकडे नोंद नसल्यास ऑनलाईन बुकिंग करता येत नसल्याने पर्यटन व्यावसायिकांना फटका बसत असल्याचा मुद्दा काही जण उपस्थित करत आहेत. पण, नोंदणी सक्तीची करण्याची पर्यटन खात्याची भूमिका राज्य व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि पर्यटन व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी महत्त्वाची असून नोंदणीच्या सक्तीच्या विषयावर पर्यटन खाते ठाम आहे, असे आजगावकर यांनी सांगितले.

पर्यटन व्यावसायिकांच्या विरोधात नाही!
सरकार पर्यटन व्यावसायिकांच्या विरोधात नाही. उलट सरकार पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहनच देते. पर्यटन खात्याकडे नोंदणी करण्यासाठी घरपट्टीची पावतीही पुरेशी आहे. आपली घरे – खोल्या भाड्याने देणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन खात्याकडे नोंदणी करण्यास पुढे यावे. यात राज्याचे व या व्यावसायिकांचेही हीत आहे. नोंदणी करण्यास कोणालाही काही अडचण व अडथळा आल्यास त्यांनी आपल्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आजगावकर यांनी केले आहे.

सर्व घटकांच्या संमतीनेच नियम…
गोवा हे पर्यनट स्थळ असल्याने या ठिकाणी जगभरातून लोक येतात. त्यामुळे राज्य तसेच देशाच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होतो. यातूनच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची नोंद आवश्यक असण्याचा मुद्दा पुढे आला आहे. मागे झालेल्या पर्यटन व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चेत आला होता व या सर्व घटकांच्या संमतीनेच हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!