श्री क्षेत्र रुद्रेश्वर, हरवळे…. हिरवागर्द प्रवास

आपला गोवा, सुंदर सात्विक गोवा

Goan Varta Live | प्रतिनिधी

स्नेहा सुतार : डिचोली पासून पुढे साखळीला गेल्यानंतर काहीच अंतरावर म्हणजे अगदी दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर हरवळे गावात पोहोचल्यावर रुद्रेश्वर कॉलनी आली की उजवीकडे एक फाटा जातो. त्या फाट्याने आत शिरल्यावर सुरू होतो हिरवागर्द प्रवास. रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर पोखरुन रस्ता केल्याने झालेल्या दगडाच्या भिंती आणि झाडं. थोड्याच वेळात नंतर वळणावळणाच्या वाटेने गेल्यावर डाव्या बाजूला डोंगराचा कापलेला भाग, उजव्या बाजूला कुळागर असा बेत जिथे बनतो तिथे गाडी ठेवून कुळागराची शीतलता, हिरवाई डोळ्यांनी मनसोक्त पिउन जरासं पुढे चालत गेलं, की समोरचं श्री रुद्रेश्वराचं मंदिर बघून आपोआपच हात जोडले जातात.

लहान असल्यापासून मी श्री क्षेत्र रुद्रेश्वर मंदिरात आई-बाबांबरोबर यायचे.तिथे गेल्यानंतर बालमनाला भगवान श्री शंकरांबद्दल वाटणारा एक प्रकारचा भीतीयुक्त आदर म्हणा, श्रद्धा म्हणा दाटून यायचे. . त्याला कारणही तसेच. श्रावणी सोमवारी हमखास येथे जाणे व्हायचे. आणि ह्या श्रावणाच्या दिवसात या क्षेत्राच्या आवारात पाऊल ठेवल्यावर गर्द झाडांनी आलेला एक प्रकारचा काळोखाला हातमिळवणी करून येणारा वातावरणातला वेगळेपणा नक्कीच जाणवतो. त्याचबरोबर आत खोल काळजात घुसणारा अस्सल पावसातला धबधब्याचा भेदक आवाज. अगदी काळजात धस्स व्हावं असा उंचीवरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज त्या लहानपणी तेवढाच- धडधडणारं काळीज सशाचं बनवून जायचा.

भगवान शंकराप्रमाणे शांत ध्यानमग्न तर प्रसंगी तांडव नृत्य करणारा उग्र स्वरूपी नटराज – असं इथलं वातावरण त्यावेळी वाटत असायचं. पण खरोखर इथं तुम्ही कुठल्याही मोसमात गेलात तरी आजूबाजूची गर्द हिरवाई तुम्हाला अलगद कुशीत घेतेच. घाबरू नकोस…असंच जणु ती मुक्याने सांगत असते. अश्या रुद्रेश्वराचं रूप तिनेच उलगडावं. नाही का?

श्री रुद्रेश्वर देवस्थान हे गोव्यातील एक महत्त्वपूर्ण असे शिवमंदिर आहे. पुरातन काळापासून एक जागृत देवस्थान म्हणून हे ओळखले जाते. मंदिराकडे येताना वाटेत आपल्याला पांडवकालीन गुंफा बघायला मिळतात. हिरव्यागार पार्श्वभूमीवर काळ्या कातळाच्या या पांडवकालीन गुंफा आकर्षक वाटतात. मंदिराचा एकुण आवार गर्द हिरवाईत वसलेला आहे. 24 सप्टेंबर 1924 साली श्री रुद्रेश्वर देवस्थानाची नोंदणी झाल्याची नोंद मिळते.

मंदिराच्या आत प्रवेश करताच रुद्रेश्वर लिंग समोर नजरेत भरते. शांतता, मांगल्य आणि भक्तिभाव मनात भरून आल्यावर साहजिकच थोडा वेळ मंदिरात शांत बसून ओमकार जप करण्याचा मोह होतोच.आपल्या नित्य नियमाच्या भणभणीत आयुष्यातून साक्षात रुद्रेश्वराच्या पायाशी आल्यानंतर मिळणारी ही शांतता आपल्याला पुन्हा त्याच दैनंदिन व्यवहारी जगात पाऊल ठेवायला उभारी देते.

अशी ‘तुजविण शंभू मज कोण तारी’ भावना सोबत घेऊन मंदिरातून बाहेर आल्यावर समोर नदीचं पात्र दिसतं आणि त्या रुद्रेश्वराच्या तांडवाचा आविष्कार बघायला घनगंभीर असा धबधब्याच्या पाण्याचा आवाज नकळत खेचत आपल्याला त्याच्यापाशी घेऊन जातो. काही पायर्‍या चढून वर गेल्यावर वर वर उग्र वाटणारं रूप आपल्याला सुखावून जातं. या धबधब्याची खासियत म्हणजे इथे कधीही या, हा निसर्ग रुपी रुद्रेश्वर तुम्हाला दर्शन देईलच.

डोंगर, दऱ्या, नद्या अशा निसर्गाच्या सानिध्यात ध्यानस्थ बसणाऱ्या शिवशंभुला हा निसर्गरम्य परिसर बघून नक्कीच इथे वसण्याचा मोह झाला असेल असे वाटत राहते. हिरवाईची माया आणि शिव शंभूचा वरदहस्त माथ्यावर घेऊन निघताना मात्र वाटेतलं हिरवेपण सारखं खुणावत राहतं. अशा ठिकाणी सहज ओळी सुचून जातात…

हिरव्यात बोलले कुणी
दुःख विसरूनी
सांगे नवलाई
ओळख ही सांगते जुनी
पंख पसरुनी
नांदे हिरवाई

हेही वाचा –

किल्ले हळर्ण… व्वा! खूपच सुंदर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!