माझ्या गोव्याच्या भूमीत…स्वर्ग भ्रमंतीच्या वाटे !

जागतिक पर्यटन दिनानिमित्त...

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

गोव्याच्या भूमीबद्दल बोलताना, लिहीताना बाकीबाब अर्थात ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्या शब्दांना वंदन केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. विषय कोणताही असो, त्यांनी आपल्या शब्दातुन अजरामर केलेली गोव्याची ओळख आ चंद्र सूर्य प्रत्येकाच्याच हृदयात कायम राहणार आहे. गोव्याच्या निखळ आणि अप्रतिम निसर्गाचं वर्णन करण्यासाठी बाकीबाब यांचेच शब्द यथोचित ठरतील. या स्वर्गीय सौंदर्यामुळंच तर गोव्यानं जगाच्या पर्यटन नकाशावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. आज 27 सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिन. या अनुषंगानं अनेक पैलूंनी आज गोव्याच्या पर्यटनक्षेत्रावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

का साजरा होतो जागतिक पर्यटन दिन…

पर्यटनाचा, जागतिक पातळीवर सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक मूल्यांवर आणि आंतरराष्ट्रीय समुदायातील पर्यटनाच्या भूमिकेवर कसा परिणाम होतो, याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 1980 मध्ये युनायटेड नेशन्स जागतिक पर्यटन संघटन (UNWTO) स्थापन करण्यात आलं. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने या क्षेत्राच्या विविध पैलूंविषयी हे संघटन मार्गदर्शन करते. पर्यटन विकासासाठी कार्य करते. भारतासह या संघटनेचे 155 सदस्य आहेत. स्पेनमधील टोरोमॉलीनोज येथे 1979 मध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या सभेत 1980 पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. इस्तंबूल, तुर्की येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत असा प्रस्ताव मांडला गेला की, जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी एका यजमान देशाने संघटनेचे भागीदार म्हणून काम पहावे. तेव्हापासून प्रत्येक वर्षी एक देश या दिनाचे यजमानपद भुषवतो. पश्चिम आफ्रिकेचा सुंदर किनारपट्टी देश, कॅरेट डी’इव्होअर जागतिक पर्यटन दिन 2021 चा यजमान देश आहे.

काय आहे यावर्षीची थीम

जागतिक पर्यटन दिन 2021 ची थीम ‘सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन’ आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, पर्यटनाशी संबंधित लोकांना शक्य तितक्या प्रत्येक मदत करणे हे संघटनेचे उददीष्ठ आहे. “हा दिवस साजरा करून आम्ही आमची वचनबद्धता सांगतो की, पर्यटन वाढत असताना, आपल्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण क्षेत्राच्या प्रत्येक स्तरावर, सर्वात मोठ्या विमान कंपनीपासून छोट्या कौटुंबिक व्यवसायापर्यंत मिळणारे फायदे जाणवतील,” असं यासंदर्भात युनायटेड नेशन्स जागतिक पर्यटन संघटनचे सरचिटणीस झुरब पोलोलिकाविली त्यांच्या अधिकृत संदेशात सांगतात.

काय आहे पर्यटनाची सध्यस्थिती

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रकाशित केलेल्या ग्लोबल ट्रॅव्हल अ‍ॅन्ड टुरिझम कॉम्पिटिटिव्ह रिपोर्ट 2019 मध्ये भारताने ३४ व्या स्थानापासून ६ व्या स्थानी झेप घेतली आहे. जानेवारी ते जुलै 2019 या कालावधीत भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या ही 60,84,353 इतकी आहे.जानेवारी ते जुलै 2019 दरम्यान, एकूण 15,34,293 पर्यटक ई-टूरिस्ट व्हिसाचा वापर करून भारतात दाखल झाले आहेत. जुलै, 2019 मध्ये भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांची टक्केवारी ही इतर 15 प्रमुख पर्यटनास प्रसिद्ध असलेल्या देशांपेक्षा सर्वाधिक आहे. जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत भारताची परकीय चलन कमाई 69,177 कोटी रुपये होती. जानेवारी-एप्रिल 2018 मध्ये झालेल्या 68,354 कोटी रुपयांच्या तुलनेत ती अधिक आहे. 2019 मध्ये, गोवा राज्यात येणा र्या देशांतर्गत पर्यटकांची संख्या अंदाजे 7.1 दशलक्ष इतकी होती, तर परदेशी पर्यटकांची संख्या 0.9 दशलक्षाहूनही जास्त होती.

गोव्यात पर्यटकांचं प्रमाण वाढतंय
गोव्याला “ओरिएंट ऑफ पर्ल” आणि भारताची बीच राजधानी असे संबोधले जाते. नैसर्गिक सौंदर्य, अद्वितीय वारसा आणि संस्कृतींचे एक निवडक मिश्रण आणि अनोखे आदरातिथ्य यामुळं हे भारतातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळ आहे. पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 40 टक्केहून लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे त्यावर अवलंबून आहे. एकूण पर्यटकांसह या क्षेत्रात मजबूत वाढ झाली आहे. 2005 मधील 2.3 दशलक्ष वरून 2017 मध्ये 7.8 दशलक्ष इतकी वाढ झाली आहे. ही वाढ सुमारे 11 टक्के इतकी आहे.

कोविड सर्वात मोठा फटका पर्यटन क्षेत्राला

उपलब्ध माहितीनुसार भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन व्यवसायाचा हिस्सा ९.२ टक्के, तर जगाच्या जीडीपीत दहा टक्के इतका आहे. भारतात सुमारे २.६७ कोटी जणांना पर्यटनातून रोजगार मिळतो. २०१८ या वर्षात पर्यटन व्यवसायातून भारताला २८.६ अब्ज डॉलरची कमाई झाली आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्यामुळे आणि सोयीसुविधांची उपलब्धता वाढत गेल्यामुळे, या क्षेत्राची उलाढाल २०२५ पर्यंत २०१८ सालाच्या जवळपास दीडपट होईल, असे अनुमान अगदी फेब्रुवारीपर्यंत वर्तवले जात होते, पण एकाएकी कोरोनाचे संकट आले आणि तसे पाहता त्याचा पहिला बळी गेला पर्यटनाचा.

रोजगार साखळी झाली विस्कळीत

या विषाणूचा संसर्ग एका देशातून दुसऱ्या देशात होऊ नये, यासाठी देशादेशांनी आपल्या सीमा बंदिस्त करण्यास, विमान वाहतूक बंद करण्यास सुरुवात केली. परिणामी, आधी विदेशातील आणि नंतर देशांतर्गत सहली रद्द झाल्या. लाखोंनी बुकिंग रद्द झाले. हॉटेल इंडस्ट्री संकटात सापडली. विविध पर्यटनस्थळी पर्यटकांवर अवलंबून असणारे टॅक्सी व्यावसायिक, अन्य सेवा देणारे व्यावसायिक, छोटे-मोठे विक्रेते या सर्वांची रोजीरोटी बंद झाली. पर्यटन व्यवसायातील ही रोजगार साखळी नक्कीच विस्किळत झाली.

गरज आहे ती व्यावसायिक गांभीर्य आणि स्ट्रॅटेजीची

गोव्याला कोकणी भाषेत भांगरभूय म्हटलं जातं, म्हणजे गोवा ही सुवर्णभूमी आहे. होय, निसर्गाचं लाभलेलं वरदान, स्वच्छ समुद्रकिनारे, संस्कृती आणि परंपरा यांचं अनमोल वरदान या भूमीला लाभलंय. पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी अनेक पायाभूत सोयीसुविधा इथं उभारण्यात आल्याच आहेत. अनेक मोठे प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहेत तर अनेक प्रस्तावित आहेत. कोविडचा सर्वाधिक फटका गोव्याच्या पर्यटनाला बसला कारण हा उद्योग गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. यातुन सावरण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र या प्रयत्नांची गती वाढायला हवी.

पर्यटन क्षेत्र राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज

प्रकल्प कोणते आणावेत, स्थानिक जनतेचं काय मत आहे, याबाबत सर्वंकष चर्चा अगोदर व्हायला हवी, तरच ते कोणत्याही वादाशिवाय पुर्णत्वाकडं जातील. या शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे गोव्याच्या ग्रामीण पर्यटनाकडं अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. याचं मुख्य कारण म्हणजे जाणकार पर्यटकांना आकर्षित करण्याची मोठी ताकद शहरी भागाप्रमाणं गोव्याच्या ग्रामीण भागातही मोठया प्रमाणावर आहे. गोव्याची समृध्द खाद्यपरंपरा तर आजही ग्रामीण भागातच अधिक मुळ रूपात आढळते. या सर्वांचा सर्वंकष विचार होण्याची गरज आहे. अनेक देशांनी खुप चांगल्या पध्दतीनं पर्यटन व्यवसायाचा खुप चांगला सेटअप तयार केला आहे. त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे. त्यावर कार्यवाही होण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे क्षेत्र राजकारणापासून बाजुला ठेवण्याची गरज आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!