पर्यटनाला उभारी देण्यासाठी केंद्राकडून गोव्याला विशेष पॅकेज?

सरकारकडून विशेष पॅकेजसाठी प्रयत्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोना महामारीत प्रचंड आर्थिक नुकसान राज्याच्या पर्यटन क्षेत्राला बसलं. पर्यटन क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागली. त्याचं नुकसान अजूनही भरुन निघालेलं नाही. त्यामुळे आता सरकारनं केंद्राकडून विशेष पॅकेज पर्यटन क्षेत्रासाठी मिळतील, अशा पद्धतीचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती समोर येते आहेत.

जखमांना पॅकेजचं मलम

द गोवनने दिलेल्या वृत्तानुसार अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांना याबाबत लेखी माहितीदेखील देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्राचं लॉकडाऊनचं मोठं नुकसान झाल्याचं मान्य केलंय. त्यांनी अर्थमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी केल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळे आता पर्यटन व्यवसायासाठी नेमकी काय घोषणा केंद्राकडून केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, १ फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राबाबत भरीव तरतूद नसल्यानं राज्यातील व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती. पर्यटनाला चालना देण्यासाठी काहीच अर्थसंकल्पातून मिळालं नसल्याची टीका व्यावसायिकांनी केली होती.

उभारी मिळेल?

पर्यटनातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या येणारा महसूल मोठ्या प्रमाणात बुडल्यानं उत्पन्नात मोठी घट झाल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे खाणी बंद असल्याचाही मोठा फटका राज्याला बसलाय. त्यामुळे केंद्राकडून विशेष पॅकेजची घोषणा झाल्यास पर्यटनाला उभारी देण्यासाठी मोठं बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

घोषणा कधी?

दुसरीकडे ट्रॅव्हल आणि टुरीझम असोसिएशनच्या जॅक सुखिझा यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सरकारवर टीका केली होती. व्यावसायिक क्षेत्राला, पर्यटनाला उभारी देण्यासाठी अर्थसंकल्पातून कोणतीच तरतूद न केल्यानं या क्षेत्राला जिवंत ठेवण्यासाठी नेमकं सरकार काय करणार आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान आता विशेष पॅकेजबाबत नेमकं केंद्राकडून काय पाऊल उचललं जातं, हे पाहणं महत्त्वाचंय. सरकारच्या प्रयत्नांमुळे पर्यटन क्षेत्रासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली जाते का, याकडे राज्याच्या संपूर्ण पर्यटन क्षेत्राचं लक्ष लागलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!