किल्ले हळर्ण… व्वा! खूपच सुंदर

Goan Varta Live | प्रतिनिधी
स्नेहा सुतार : अस्नोड्याहून आम्ही दुपारी निघालो ते एक पंधरा वीस मिनिटात हळर्ण या गावात पोहोचलो. जाताना वाटेत सुंदर,हिरवी, शांत गावं लागत होती. हिरवागार निसर्ग, गावातली बैठी, सुबक, सुंदर घरं; हिरवीगार शेतं भाटं बघत-बघत कधीच आम्ही त्या गावात पोहोचलो. एका छोट्याशा रस्त्याने आम्ही किल्ल्याच्या दिशेने जात होतो, तोवर समोर नदीचं पात्र आणि उजव्या बाजूस किल्ल्याची तटबंदी दिसू लागली. गाडी उजवीकडे वळून किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर पार्क केल्यावर गाडीतुन उतरून बघितलं असता “व्वा!! सुंदर !!!” असेच उद्गार प्रत्येकाच्या तोंडातून आले. समोर वाहणारी शापोरा नदी,पैलतीरावर लांब लांबपर्यंत दिसणारी हिरवळ, माड पोफळी एखाद्या उमद्या तरुणासारखे अवखळ, पण ऐटीत वाऱ्यावर डोलत असलेले, नदीच्या ऐलतीरावर खुरीस आणि आणि किल्ल्याची तटबंदी-एखाद्या गळ्यातल्या हाराच्या सारखी पसरून मध्ये एखादं लॉकेट असावं तसं किल्ल्याचं प्रवेशद्वार.
आधी काही पायर्या उतरून नदीकाठावर गेले. समोर विस्तीर्ण पहुडलेली शापोरा नदी उन्हात नुसती चमचमत होती. पावसाळा संपता संपता भरलेल्या नदीचं वाऱ्याने हेलकावणारं पाणी बघुन जणू – त्या ऐन तारुण्यातील नदीच्या पायांना वारा मोरपंखी गुदगुल्या करतोय आणि नदी संयमाने आपलं राजबिंडं वैभव जपत गालातल्या गालात खळी पाडत हसतेय असाच भास व्हावा. उन्हात नदीचं पाणी नुसतं लखलखत होतं. वैभव वैभव म्हणावं तर ते हेच !! नुसतं सोनं!!! या सगळ्याच्या पलीकडे, हे वैभव पहात माड पोफळी आपली झावळं सावरत उभे होते. दुपारच्या वेळेचा थोड माजोरडा वारा आपला जोर दाखवत माडा-पोफळींशी हुज्जत घालत होता.

पण हे माड पोफळी जसे काही एखाद्या उमद्या तरुणासारखे त्याला हूल देत आपल्याच गुर्मीत डोलताना दिसत होते. डोळाभर हे दृश्य साठवून इच्छा नसताना मागे वळले, तर समोरच्या वर जाणाऱ्या दगडी पायऱ्यांच्या पलीकडे दिसणारा किल्ला आणि त्याच्या समोरच्या बाजूस सैनिक तैनात असावा तसा उभा असलेला माड हे दृश्य डोळ्यात भरले. पायऱ्या चढून वर आले आणि सरळ किल्ल्याच्या प्रमुख द्वारातून आत गेले. आत सरताना दोन्ही बाजूला पहुडलेल्या दोन तोफा येणाऱ्याचे जणु स्वागतच करतायत अश्या स्थानापन्न झालेल्या.
थोडासाच वेळ काढून वर गेल्यावर पूर्ण तटबंदी आणि एखाद्या घरासारखा वाटणार एक भाग तेवढा दिसला. तीनशे वर्षांच्या या किल्ल्याच्या कालखंडातले किल्ल्याचे काही थोडेसेच अवशेष तिथे पाहायला मिळतात. या छोटेखानी गढीवजा किल्ल्याच्या संरक्षणासाठी चारही कोपऱ्यांमध्ये चार भव्य बुरूज उभारलेले दिसतात. किल्ल्याच्या चौफेर असलेली किल्ल्याची उत्तम स्थितीतली तटबंदी डोळ्यात भरल्याशिवाय राहत नाही.
अधिक इतिहास अभ्यासकांचे व दुर्ग अभ्यासकांचे लेख व ब्लॉग पडताळून पाहिले, तर हा किल्ला सतराव्या शतकात सावंतवाडीचा भोसले यांनी त्यांच्या पेडणे, डिचोली, मणेरी प्रदेशावर वारंवार होणारे पोर्तुगीजांचे हल्ले रोखण्यासाठी म्हणून बांधला.परंतु लगेचच ४ मे, १७४६ साली मार्किस ऑफ क्रास्टेलो नोवो या पोर्तुगीज अधिकाऱ्याने हा किल्ला जिंकून घेतला. या कामगिरीसाठी त्याला ‘मार्किस दे अलोर्ना’ अशी ओळख मिळाली .पुढे १७६१ झाली तो किल्ला पुन्हा भोसल्यांकडे आला. पण पोर्तुगीजांनी डोम फ्रेडरीको गिलहेर्मे डिसूजाच्या नेतृत्वाखाली २५ ऑगस्ट १७८१ रोजी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. अशाप्रकारे पोर्तुगिजांनी मराठ्यांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी या किल्ल्याचा पुरेपूर फायदा करून घेतल्याचे दिसून येते.

#सुंदरसात्विकगोवा
गोव्याकडे नुसतं ‘खाओ पीओ मजा करो’ या दृष्टिकोनातून पर्यटन साधणाऱ्या मानसिकतेचा बदल होऊन आपल्या राज्यातील हे लाख मोलाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवे जपून ठेवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे गोमंतकीय म्हणून स्वतःची ओळख सांगताना आपण गोमंतकीयांनी हे आपले सांस्कृतिक ऐतिहासिक ठेवे जगासमोर ठेवले पाहिजेत. चला तर मग, आपल्या गोव्याची आपण आता ‘खरी’ ओळख जगासमोर आणूया… #सुंदरसात्विकगोवा