श्री क्षेत्र बोडगेश्वर, म्हापसा

नातं गोव्याचं देणं मराठीचं!

Goan Varta Live | प्रतिनिधी

स्नेहा सुतार : सारे काही ढळलेले, डळमळलेले, गोंधळलेले
काही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले,
शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणता
काळोखाचा रंग कोणता

खरं तर असंच काहीसं आपल्या सर्वांच्याच बाबतीत घडत असतं. शहराचा वारा म्हणता म्हणता गावा खेड्यात पोहोचला. खेड्यापाड्यातली माणसं कामानिमित्त, शिक्षणानिमित्त शहराकडे धाव घेऊ लागली. किंवा आपलं गोवा लहान असल्यामुळे गावातून शहराकडे ये जा करणं सोपं झाल्याने रोज ही ये जा करू लागले. गावं कात टाकू लागली. शहरं रोजच कात टाकत असतात. पण गावाच्या शांत प्रस्थापिततेला शहराचा वारा लागला. ही शांतता हरवू लागली. माणसाची मानसिकता पोटापाण्यासाठी धावता धावता दोलायमान होऊ लागली.

मात्र गोव्याच्या माणसांचा एक गुण आपण इथे सांगितला पाहिजे…सगळ्या ताण तणावातून, गजबज गोंगाटातुन तो सहज हा नेमका काळोखाचा रंग शोधू शकतो. हा काळोखाचा रंग त्याला कुठल्या पार्ट्यांमध्ये, पब मध्ये न मिळता प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात असलेल्या त्या त्या ठिकाणच्या इष्ट देवतांच्या पायाशी गेल्यावर “मात्शे बरें दिसलें “, “जीव सूंsss जालो ” अशा शब्दात तो करतो…

असंच आपल्याला जाणीव देऊन जाणारं एक दृढस्थान म्हणजे म्हापश्याचे श्री बोडगेश्वर देवस्थान. शहर असलं तरी संध्याकाळपर्यंत अगदी शांत होणारं शहर म्हणजे म्हापसा. आपल्या घरात जशी आई सकाळपासून घरासाठी जीव तोडून राबत असते. सकाळपासून दिसत असतो तो तिचा उत्साह.

मात्र संध्याकाळच्या दिवेलागणीवेळची आई मुद्दाम बघा…एखाद्या अवखळ नदीने शांतपणे वळणावर वाहत जावं, अंगणातली तुळस वाऱ्याने डोलावी आणि त्यात जी निर्मळता दिसावी किंवा सरळ एखाद्या गायीच्या डोळ्यात जे वात्सल्य दिसावं ती निर्मळता, ती शांतता, ते वात्सल्य त्या दिवेलागणीच्या वेळी आईच्या चेहऱ्यावर तिन्हीसांजेच्या कातरवेळी दिव्याच्या प्रकाशात मी नेहमीच अनुभवली.

अशीच शांतता, निर्मळता, वात्सल्य मला म्हापश्याच्या बाबतीत वाटतं. दिवसभर गजबज, गोंगाट, धावाधाव करणारं हे शहर संध्याकाळ झाली की असं स्थिरावतं, काहीसं गंभीर होतं. पण ही गंभीरता शांत सात्विक असते. घराला वडील म्हणजे एक भरभक्कम पाया असतो तसंच अख्या म्हापश्याचा राखणदार बोडगेश्वर त्याच्या निश्चल डोळ्यांनी म्हापश्याकडे नजर ठेऊन असतो.म्हापश्याचा माणुस कधी संकटाला घाबरणार नाही की कुठल्या भुताखेतांना घाबरणार नाही. बोडगेश्वरा पाव रे म्हटलं की हा राखणदार त्याच्या हाकेला धावून येणारच हा प्रत्येक म्हापशेकराच्या मनःपटलावर त्याच्या जन्मापासून कोरलेला विश्वास असतो. श्रद्धा असते.

श्री बोडगेश्वर देवस्थान किंवा स्थानिक लोकांमध्ये बोडगीणी असा उल्लेख केला जाणारं हे देवस्थान म्हापश्याहून पणजीच्या दिशेने जाताना, म्हापसा बस स्थानकाच्या पुढे काही अंतरावर उजवीकडे दिसतं . सुंदर रेखीव बांधकाम व परिसर लाभलेली ही वास्तु जणु काही लांबवर शांत राहुन पूर्ण शहरावर नजर ठेवून उभी आहे. मंदिरात गेल्यावर नजरेत भरणारी बोडगेश्वराची उंचपुरी मूर्ती, ‘ये मी तुझी वाट बघतोय ‘ असंच जणु काही आपल्याला सांगतेय. भरभक्कम आधार असावा तर असा…

कमावलेली पुष्ट देहयष्टी, पहाडी चेहरा, भरदार मिश्या, मोठे पण आश्वासक मायेने ओतप्रोत असलेले डोळे, डोक्यावर फेटा, उजव्या हातात दांडा, तर डाव्या हातात मशाल अशी मूर्ती बघितल्यावर प्रत्येक म्हापशेकर किंवा बोडगेश्वरावर नितांत श्रद्धा असलेला प्रत्येक गोवेकर संकटकाळी “बोडगेश्वरा पाव रे ” अशी साद का देत असावा याची कल्पना येते. हाक मारल्यासरशी आत्ता उठुन हाकेला धावून येईल अशीच त्याची ती मूर्ती आणि संकटकाळी अनेकांना आलेला त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय त्याच्या अस्तित्वाची साक्ष देतात. त्याच्या हातातला दांडा हा चुकलेल्याच्या पाठीत घालायला, वाईटाचा नाश करायला आणि दुसऱ्या हातातली मशाल भरकटलेल्यांना मार्ग दाखवायला..

आजच्या वैज्ञानिक युगात देव बिव मानत नाही असं सांगणाऱ्याने इथं यावं…बोडगेश्वराच्या पुढ्यात उभं राहावं. त्याची सावली डोक्यावर घ्यावी… तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार याचा प्रत्यय घ्यावा. एक साधारण आपल्यासारखाच वाटणारा एखादा, आपल्या कर्माने देवत्व कसं दाखवतो याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. माणसाने असंच असावं नाही का?
जो दुसऱ्यांसाठी धावून जातो, दुसऱ्यासाठी झटतो, दुसऱ्यांच्या हाकेला धावतो तोच देव मानावा. त्याच्याशी देवाचं जवळचं नातं असतं. माणसाने माणसाशी मनासासम वागणे असावे तर हे असे. तेव्हाच अहम ब्रम्हास्मिची ज्योत आपल्यात जागते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!