सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा ‘दुर्मिळ प्युमिस’ दगड ! ‘या’ भुगर्भशास्त्राच्या अद्भुत रचनेबद्दल जाणून घ्या

ऋषभ | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड सापडला आहे. ओरोस येथे वास्तव्याला असलेले जागतिक कीर्तीचे भुगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभु यांनी या दगडाचे वर्णन ‘दुर्मिळ आणि मी आतापर्यंत ज्याच्या शोधात होतो तो’, अशा शब्दात केले आहे.
याबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, ‘आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणांना अनेक कारणांनी भेट देत असतो. अशाच एका भटकंतीत वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर आपणाला वजनाने हलकी व पाण्यावर तरंगणारी वस्तु आढळली. वरुन पाहिले असता ही वस्तु दगडासारखी आहे. पण ती सच्छिद्र आहे. प्रथमदर्शनी दगडासारखी दिसणारी, पण पाण्यावर तरंगणारी ही वस्तु नेमकी काय आहे, हे जाणुन घेण्यासाठी लळीत यांनी भुगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभु यांची भेट घेतली.’
स्पॉंन्जप्रमाणे अंतर्गत रचना असलेला हा खडक आणि त्याची व्युत्पत्ती
- ‘प्युमिस’ नावाचा दगड हा ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक (व्हल्कॅनिक पोरस रॉक) आहे. हा आपल्या भागात अतिशय दुर्मिळ आहे. जेव्हा विशेषत: समुद्रात पाण्याखाली ज्वालामुखीचा विस्फोट होतो, तेव्हा पृथ्वीच्या अंतर्भागातून लाव्हारस प्रचंड वेगाने आकाशात उंच फेकला जातो. या लाव्ह्यामध्ये अनेक प्रकारचे वायु असतात.
- वर गेलेला हा लाव्हा जेव्हा खाली येऊ लागतो, तेव्हा तो घट्ट होण्याची प्रक्रिया लगेचच सुरु होते. पाणी, कर्बवायु व अन्य वायुंचे विघटन, हवेचा दाब आणि अन्य बाबींमुळे हा लाव्हा घट्ट होऊन दगडात रुपांतरित होण्यापुर्वी त्यात असंख्य छिद्रे तयार होतात. त्यामुळे या दगडाच्या वस्तुमानात दगडाचे प्रमाण केवळ १० टक्के असते व आकारमानात ९० टक्के भाग हा पोकळ व छिद्रमय असतो.

- यामुळे तो दिसायला मोठा असला तरी वजनाला हलका असतो आणि सच्छिद्र असल्याने पाण्यावर तरंगतो. रामायणातील एका प्रसंगात श्रीरामाने व त्याच्या वानरसेनेने रावणाच्या लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला. यासाठी जे दगड वापरले ते पाण्यावर तरंगणारे होते, असा उल्लेख आहे. यामुळे काही ठिकाणी अशा दगडांना ‘रामसेतुचा दगड’ असेही म्हणले जाते.

प्यूमिस कुठे सापडतो ?
- ‘प्युमिस’ दगड जगाच्या सर्व भागात विशेषत: समुद्रकिनारी आढळतो. इंडोनेशिया, जपान, न्युझीलंड, अफगाणिस्तान, सिरीया, इराण, रशिया, तुर्कस्तान, ग्रीस, इटली, हंगेरी, जर्मनी, आईसलँड, उत्तर व दक्षिण अमेरिका, केनिया, इथिओपिया, टांझानिया आदि देशांमध्ये हा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो.

- तरंगणारा असल्याने समुद्राच्या पाण्यातील प्रवाहामुळे तो पाण्यातून प्रवासही करतो. ज्या भागात जागृत ज्वालामुखींचे प्रमाण मोठे आहे, अशा अनेक देशांमध्ये याचा वापर औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. याच्यात काही प्रमाणात औषधी द्रव्येही असतात. त्यामुळे चीनसारख्या देशात हजारो वर्षे त्याचा औषधी वापर होत आहे.
- आंघोळ करताना अंग घासण्यासाठीही याचा वापर होतो. भारताच्या किनारपट्टीवर मात्र तो अभावानेच सापडतो.

प्युमिसचे उपयोग
युनायटेड स्टेट्समध्ये प्युमिसचा सर्वात मोठा वापर म्हणजे हलके कॉंक्रिट ब्लॉक्स आणि इतर हलके कॉंक्रीट उत्पादनांचे उत्पादन घेण्यासाठी केला जातो . जेव्हा हे काँक्रीट मिसळले जाते तेव्हा पुटिका अर्धवट हवेने भरलेल्या राहतात. त्यामुळे ब्लॉकचे वजन कमी होते. हलके ब्लॉक्स इमारतीच्या स्ट्रक्चरल स्टीलची आवश्यकता कमी करू शकतात अडकलेली हवा ब्लॉक्सना जास्त इन्सुलेट व्हॅल्यू देखील देते.

प्युमिसचा दुसरा सर्वात सामान्य वापर लँडस्केपिंग आणि फलोत्पादनात होतो. लँडस्केपिंग आणि प्लांटर्समध्ये प्युमिसचा वापर सजावटीच्या ग्राउंड कव्हर म्हणून केला जातो. ते लागवडीमध्ये ड्रेनेज रॉक आणि माती कंडिशनर म्हणून वापरले जाते. हायड्रोपोनिक गार्डनिंगमध्ये सब्सट्रेट म्हणून वापरण्यासाठी प्युमिस हा प्रमुख घटक आहे.
