राज्यातील संस्कृती पर्यटनाच्या प्रसारासाठी तीन दिवस राज्य स्तरावर चिखलकाला: खंवटे

माशेलात चिखलकाल्याचा शानदार शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी, दि. २9 – राज्य सरकार इको, साहस, क्रीडा आदी क्षेत्रांसह पर्यटनाच्या नवनव्या कक्षांचा प्रसार करत असून आध्यात्मिक पर्यटनासह राज्यातील सांस्कृतिक ठेवा जपून ठेवण्याच्या हेतूने माशेलमधील चिखलकाला राज्य स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे पर्यटनंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

ते आज पर्यटन खात्यातर्फे आयोजित तीन दिवसांच्या चिखलकाल्याचा शुभारंभ केल्यानंतर माशेलच्या देवकीकृष्ण मंदिर आवारात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पर्यटन संचालक सुनील आंचिपाका, मंदिर समिती अध्यक्ष गिरीश धारवाडकर, किशोर भगत उपस्थित होते.

शिगमो आणि कार्निव्हल व्यतिरिक्त गोव्यात कितीतरी आगळेवेगळे उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. मात्र त्याकडे पर्यटनाच्या नजरेने लक्ष दिले जात नव्हते. ही कसर भरून काढताना राज्यातील सांजाव आणि चिखलकाला या गोव्यातील पारंपरिक उत्सवांची पर्यटकांना ओळख करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्याचे खंवटे यांनी सांगितले.

माशेलमधील चिखलकाला यंदा तीन दिवसांचा उत्सव होत असून दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने इथला माहोल खरोखरच भक्तीमय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्थानिकांसोबत इथे येणार्या पर्यटकांसाठी चिखलकाला वेगळीच पर्वणी ठरेल असे ते म्हणाले. माशेल येथील श्री देवकी कृष्ण मंदिर आवारात आजपासून 30 जूनपर्यंत चिखलकाल्या निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल राहाणार आहे.

शुभारंभानंतर संध्याकाळी देवानंद मालवणकर आणि प्रियांका रायकर यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर झाला. एकापेक्षा एक अशा सरस भक्तीगीतांनी त्यांनी रसिकांना रिझविले. तद्नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने रसिक श्रोतावर्ग तृप्त झाला. उद्या 29 जून रोजी रात्री 8 वाजता भक्ती संगीताचा भक्तीरंग कार्यक्रम होणार आहे.

30 जून रोजी सकाळी 11 वाजता पारंपरिक चिखलकाला खेळला जाणार असून दुपारी देवतांच्या आरतीने उत्सवाची सांगता होईल, यंदाच्या चिखलकाला उत्सवात पारंपरिक चिखलकाल्या बरोबरच गोमंतकीय खाद्य संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात प्रख्यात गायकांच्या भक्ती संगीताने माहोल भक्तिमय होईल.

कला व संस्कृती मंत्री गावडे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. पर्यटन विस्ताराच्या वृध्दीसाठी पर्यटन खात्याकडून होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
संचालक आंचिपाका यांनी स्वागतपर विचार मांडले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!