गोव्यातील गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्यात पर्यटन मंत्री अपयशी

मगो नेते प्रवीण आर्लेकरांची टीका; मुख्यमंत्र्यांनी कोसळलेल्या किल्ल्याची पाहणी करून किल्ल्याची दुरुस्ती करावी

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांची मदत घेतली ते म्हणजे आपले गड किल्ले. सह्याद्री पर्वताच्या कडेकपारी असलेल्या गड-किल्ल्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी महत्त्वाचं कार्य केलं. पेडण्यातील हळर्ण इथला किल्लासुद्धा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. अश्या महत्त्वपूर्ण किल्ल्याची तटबंदी एक बाजूने कोसळतेय आणि या भागातील आमदार तथा गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर त्याची साधी दुरुस्ती करू शकत नाही. यावरून आमदार अपयशी ठरले असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हळर्ण किल्ल्याची दुरुस्ती करुन या किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करावा, अशी मागणी पेडणे मतदारसंघाचे मगोप नेते प्रवीण आर्लेकरांनी केली.

हेही वाचाः एक जुलैपासून देशभरात होणार हे महत्वाचे बदल…

आर्लेकरांनी हळर्ण येथे किल्ल्याला भेट देऊन कोसळलेल्या तटबंदीची पहाणी केली. यावेळी हळर्ण पंचायतीच्या पंच अश्विनी परब, जयेश पालयेकर, रणजित परब, राज परब, आत्माराम परब, स्मितराज, सुखाजी परब, राजाराम लिंगुटकर, मकरंद परब, विकी परब, सगुण परब आदी उपस्थित होते.

हेही वाचाः काणकोण नगरपरिषदेच्या ड्रायव्हरला दिला अनोख्या पद्धतीने सेंडऑफ

किल्ल्यांनी केलं पराक्रमी पुरुषांचं रक्षण

या किल्ल्यांनी आपल्या पराक्रमी पुरुषांचं रक्षण केलं. आपले पराक्रमी पूर्वज या किल्ल्यांवर नांदले. त्यांचं पावित्र्य जतन करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असं आर्लेकर म्हणाले. हळर्ण किल्ल्याच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेला दारूच्या बाटल्या आर्लेकर तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढून परिसर स्वच्छ केला. किल्ल्याचं पावित्र्य संभाळणं हे प्रत्येकाचं काम असून, म्हणूनच पेडण्यातील प्रत्येकाने आता पुढाकार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पाहणी केल्यावर लक्षात आलं म्हणून लगेचच या ठिकाणी पडलेल्या बियरच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या कार्यकर्त्यांसोबत गोळा करून ठेवल्या, असं आर्लेकर म्हणाले.

किल्ल्याच्या देखरेखीसाठी सुरक्षा रक्षक नेमा

हळर्ण येथील किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक या किल्ल्यावर येत असतात. मात्र त्या ठिकाणी असलेला सुरक्षा रक्षक रविवारी घरी असल्यानं पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षा रक्षक हा दूरच्या गावातील असल्यानं किल्लाची चावी मिळत नाही. सरकारने याच गावातील गरजू युवकांना या कामासाठी नेमून पर्यटकांचा प्रश्न सोडविला, तर या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील, असं स्थानिक युवक रणजित परब म्हणाले.

हेही वाचाः वेळसांव समुद्रात 27 वर्षीय तरुण बुडाला

आमदार-मंत्र्यांची पोकळ आश्वासने

गेल्या वीस वर्षांत आम्ही केवळ आश्वासनेच ऐकत आलोत. प्रत्येक वर्षी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री या किल्ल्याला भेट देतात आणि किल्ल्याची दुरुस्ती करणार असं आश्वासन देतात. मात्र एकही आश्वासन अद्याप अस्तित्वात आलेलं नाही. पेडणेचे आमदार हे पर्यटन मंत्री आहेत, पर्यटन खात्यातर्फे अनेक गोष्टी ते याठिकाणी करू शकले असते, मात्र त्यांनी काहीच केलं नाही. यावरून पर्यटन मंत्री पूर्णतः अपयशी ठरलेत असंच दिसतं, असं मकरंद परब म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!