आर्थिक संकटात सापडलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा बळकट करणारः मुख्यमंत्री

हॉटेलांना नोंदणी, नूतनीकरणात ५० टक्के सवलत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा बळकट केला जाणार आहे. यासाठी पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेलांना नोंदणी आणि नूतनीकरणात ५० टक्के सवलत दिली होती, ती यावर्षीही लागू असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोमवारी टूर अँड ट्रॅव्हल गोवा असोसिएशनने दोनापावला येथील एका तारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, टीटीजीएचे अध्यक्ष नीलेश शहा आणि पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्याचे पर्यटन धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. विशेष चार्टर विमानांना लवकरच परवानगी दिली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या योजनेअंतर्गत टुरिस्ट गाईडना १ लाख आणि भागधारकांना १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. याचा फायदा राज्यातील व्यावसायिकांनीही घ्यावा.

पुढच्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोपा विमानतळाचे उद्घाटन

मोपा आंतराष्ट्रीय विमानतळाचे पुढच्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. गोव्यात सध्या एकच विमानतळ असल्याने अनेक समस्या येत आहेत. नॅशनल कन्वेन्शन सेंटर दोनापावला येथे उभारण्यात येणार आहे. लवकरच या प्रकल्पाचे कामही सुरू होईल. अनेक तारांकित सेवांसह ३०० खोल्यांचे हे मोठे हॉटेल पर्यटकांचे आकर्षण ठरेल. ते पुढील पाच वर्षांत पूर्ण केले जाईल. राज्यातील पात्र नागरिकांना करोनाचा दुसरा डोस ३० ऑक्टोबरपर्यंत देण्याचे सरकारचे ध्येय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील सुमारे ५० टक्के लोक पर्यटन व्यवसायावर अवलंबून

राज्यातील सुमारे ५० टक्के लोक पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यासाठी समुद्र किनारे सुरक्षित ठेवले जात आहेत. राज्याती संस्कृती सांभाळून पर्यटन क्षेत्र वाढवण्याचे सरकारचे ध्येय आहे. बेजबाबदारीने वागणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई केली जात आहे. आता किनाऱ्यावर पोलीस कक्ष असणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आणखी सुरक्षा मिळेल, असं पर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!